अलप्पुझा : देशात भाजपाचा वाढता दबदबा लक्षात घेता केंद्रातील सत्ता पादाक्रांत करण्यापूर्वीच भाजपाला रोखण्यासाठी धर्मनिरपेक्ष शक्तींनी एकत्रित यावे, असे आवाहन केंद्रीय कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीची व्यूहरचना आखताना डाव्या पक्षांनी या तथ्याकडे लक्ष द्यावे, असेही ते म्हणाले.
केरळमधील अलप्पुझा येथे पक्षाच्या बैठकीला शरद पवारांनी मार्गदर्शन केले. ते पुढे म्हणाले की, सत्ता मिळाल्यास भाजपाद्वारे त्यांचा जातीयवादी अजेंडा अंमल केला जाईल; परंतु त्याविरोधात धर्मनिरपेक्ष विचारांचे सर्मथन करणारे पक्ष एका छताखाली आल्यास अशा परिस्थितीला दूर सारता येईल. वस्तुस्थिती ध्यानात घेता, आमच्या पक्षाने केंद्रात काँग्रेसला पाठिंबा दिला तर केरळात एलडीएफची साथ दिल्याचे पवार यांनी आवर्जून सांगितले. भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या विकास अजेंड्यानुसार निवडणूक लढण्याच्या भाजपाच्या आश्वासनांवर पवारांनी या वेळी टीकास्त्र सोडले. केंद्रात भाजपा सत्तेत आल्यास तो प्रामुख्याने स्वत:चा जातीयवादी अजेंडा अमलात आणण्यास सर्वोच्च प्राधान्य देईल, असे पवार म्हणाले. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणूक डोळय़ासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसने आतापासूनच जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्या पार्श्वभूमीवरच केरळातील पक्ष कार्यकर्त्यांची बैठक पवारांनी घेतल्याची राजकीय वतरुळात चर्चा आहे.


No comments:
Post a Comment