विक्रोळी पार्कसाईटमधील आगीचे स्थायी समितीत पडसाद - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 November 2013

विक्रोळी पार्कसाईटमधील आगीचे स्थायी समितीत पडसाद

मुंबई : विक्रोळी पार्क साईट येथील आगीच्या घटनेचे तीव्र पडसाद बुधवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. या दुर्घटनेची चौकशी करून दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी मनसेचे दिलीप लांडे यांच्यासह अन्य सदस्यांनी लावून धरली. विक्रोळी पार्क साईट येथील सिद्धार्थ नगर इमारतीत एसआरए योजनेंतर्गत बांधलेल्या ७ मजली इमारतीत दोन दिवसांपूर्वी शॉर्टसर्किटने आग लागून त्यात चार जणांचा मृत्यू झाला, तर १४ जण जखमी झाले होते. 

गेल्या महिन्याभरात मुंबईत आग तसेच अन्य दुर्घटनांसदर्भात माहितीपर प्रस्ताव बुधवारी प्रशासनाने स्थायी समितीपुढे ठेवला. या वेळी बोलताना लांडे यांनी ही मागणी केली. या घटनेत अग्निशमन दल अधिकार्‍यांचा गलथानपणा कारणीभूत असल्याचा आरोपही दिलीप लांडे यांनी केला. या इमारतीत प्रवेश करण्यासाठी अग्निशमन दलाच्या वाहनांना जागा शिल्लक नव्हती. नियमाने इमारतीच्या परिसरात वाहनांची ये-जा करण्यासाठी आवश्यक जागा राखून ठेवायला हवी होती, मात्र तशी जागा राखून ठेवण्यात आली नाही. मग अग्निशमन दलाच्या कोणत्या अधिकार्‍याने या इमारतीला ना हरकत प्रमाणपत्र दिले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित करत या प्रकरणी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी दिलीप लांडे यांनी केली. 

अग्निशमन दलाचे केंद्र जवळ असताना घटनास्थळी पोहोचण्यासाठी अग्निशमन दलाच्या वाहनांना विलंब का लागला, असा प्रश्नही त्यांनी या वेळी उपस्थित केला. या सोबतच संबंधित बिल्डरवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील त्यांनी या वेळी केली. काँग्रेसचे प्रवीण छेडा, शिवसेनेच्या अनुराधा पेडणेकर यांनी या मागणीला सर्मथन दर्शवत या दुर्घटनेची चौकशी करण्याची मागणी लावून धरली. दरम्यान, या दुर्घटनेची व दोषी अधिकार्‍यांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची सूचना स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी या वेळी प्रशासनाकडे केली.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS