मुंबई : महायुतीचा घटक पक्ष असणार्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची ताकद दिवसेंदिवस वाढत असून सर्व जातीधर्मांच्या लोकांना पक्षात सामावून घेण्याच्या निर्णयामुळे आपला पक्ष अधिकाधिक बळकट होत असल्याचे रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी सांगितले.
रिपब्लिकन पक्षाने पक्ष संघटनेत ६0:४0 असे धोरण राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या पुढील काळात रिपाइंत ६0 टक्के दलित-बौद्ध आणि ४0 टक्के पदे दलितेतर कार्यकर्त्यांना देण्यात येणार आहेत. पक्ष संघटनेची ताकद वाढवायची असेल तर एका समाजापुरते र्मयादित राहून चालणार नाही. यामुळे ख्रिश्चन, मुस्लीम, जैन, मराठा, ब्राह्मण आदी सर्वच समाजाच्या लोकांना सोबत घेऊन चालण्याची तयारी आपल्या पक्षाने ठेवली असून समाजवादी विचारांच्या लोकांनाही भविष्यात रिपाइंशी जोडले जाणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.
कांतीकुमार जैन यांची कार्याध्यक्षपदी निवडरिपाइंच्या प्रदेश अध्यक्षपदी भूपेश खुलकर व कार्याध्यक्षपदी बाबूराव कदम यांची निवड यापूर्वीच करण्यात आली आहे. त्यांच्या जोडीला कांतीकुमार जैन यांचीसुद्धा कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा रामदास आठवले यांनी केली.
आगामी लोकसभा आणि राज्यसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच भाजपा नेत्यांशी आपली चर्चा झाली असून लोकसभेच्या तीन व राज्यसभेची एक जागा देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. कोणी किती व कोणत्या जागा द्यायच्या याचा निर्णय अद्याप झालेला नसला तरी महायुतीत आपल्याला योग्य तो सन्मान मिळेल, अशी आशा असल्याचे आठवले यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.


No comments:
Post a Comment