५१५ मुले पुन्हा पालकांच्या कुशीत - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 November 2013

५१५ मुले पुन्हा पालकांच्या कुशीत

मुंबई- मुंबापुरीचे आकर्षण आणि रोजीरोटीच्या शोधात अनेक जण मुंबईत येतात. तर, कधी फसवणुकीने, किंवा रागाने घरातून निघून जाणे, अशा अनेक कारणांमुळे घरातून पळून जाणा-या मुलांची संख्या राज्यात वाढत आहे. घरातून पळवून आणलेली किंवा पळून आलेली ही मुले अनेकदा सीएसटी, कुर्ला टर्मिनस, मुंबई सेंट्रल स्थानकात आढळून येतात. गेल्या सहा महिन्यांत रेल्वे पोलिसांनी अशा तब्बल ८२७ मुलांना ताब्यात घेतले आहे. त्यात ५३० मुले आणि २९७ मुलींचा समावेश आहे. यापैकी ३५९ मुले आणि १५६ मुली अशा एकूण ५१५ मुलांना पुन्हा त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले.
घरातून पळून मुंबईत आलेली ही मुले बहुतेकदा रेल्वे स्थानकांवर आसरा घेतात. रेल्वे पोलिसांनी काही महिन्यांपासून अशा ८२७ मुलांना ताब्यात घेतले. यापैकी ५१५ मुलांना परत पाठवण्यात आले. तर, सध्या १४० मुले पोलिसांच्या ताब्यात असून त्यांना लवकरच पालकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. त्याबाबतची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक मृदुला दिघे यांनी सांगितले.
२०११ पेक्षा २०१२ मध्ये लहान मुलांना पळवून नेणे, अपहरण करणे यात वाढ झाली आहे. मुंबईत अशा १४२ गुन्ह्यांची नोंद आहे. तर, २०१२ मध्ये बालकास सोडून देण्याबाबतच्या १९९ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेली बहुतांश मुले ही १२-१४ वयोगटांतील आहेत. नुकतेच सीएसटी परिसरात दोन लहान मुले अमली पदार्थाचे सेवन करत होती. एका सामाजिक संस्थेच्या वतीने त्या मुलांना पुनर्वसनासाठी पाठवण्यात आले आहे. हरवलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. तेव्हा उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांच्या ‘मिसिंग ब्युरो’ला बेपत्ता नागरिकांचा शोध घेऊन अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
मुले बेपत्ता होण्याची कारणे
हरवणे, फसगत, प्रेम प्रकरणातून फुस लावणे, मानसिक संतुलन बिघडणे, भांडण झाल्याने घरातून निघून जाणे, नोकरीच्या शोधात कुटुंबीयांना न सांगता निघून येणे, पैशासाठी लहान मुलांना पळवून आणणे.
१ हजार ८५८ बेपत्ता
मुंबई पोलिसांच्या आकडेवारीनुसार जानेवारी २०१२ ते एप्रिल १३ या काळात १ हजार ८५८ जण मुंबईतून बेपत्ता झाले. यात १५८ मुले आणि १०५ मुलींचा समोवश आहे. हे सर्व जण ८ ते १४ वयोगटांतील आहेत.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS