सफाई कामगारांचे धरणे आंदोलन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 November 2013

सफाई कामगारांचे धरणे आंदोलन

मुंबई : पालिकेच्या साफसफाई खात्यातील कामगारांबाबत प्रशासनाने अवलंबलेल्या अमानुष धोरणाच्या निषेधार्थ सफाई कर्मचार्‍यांनी आझाद मैदानात धरणे आंदोलन करून तीव्र निदर्शने केली.

डॉकयार्ड दुर्घटनेनंतर सफाई खात्यातील कामगारांना दिलेल्या सेवा निवासस्थानाची दुरुस्ती करण्याऐवजी सरसकट इमारती धोकादायक जाहीर करून त्या विनावलंब खाली करण्याच्या नोटिसा बजावण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. मात्र, त्यासाठी पर्यायी जागेची व्यवस्था करण्यात आलेली नाही. वास्तविक साफसफाई खात्याचे काम आवश्यक स्वरूपाचे असून दूरच्या ठिकाणाकडून सकाळी लवकर कामावर येणे अशक्य असल्यामुळे विस्थापित होणार्‍या कामगारांचे पुनर्वसन त्याच विभागात करणे आवश्यक आहे. सफाई कर्मचार्‍यांना मालकी हक्काची घरे देण्याबाबत महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आवास योजना निर्माण केली. मात्र, त्याची अंमलबजावणी करण्याबाबत प्रशासन उदासीन आहे. त्यामुळे सफाई कर्मचार्‍यांत संतापाचे वातावरण पसरले असल्याचे म्युनिसिपल मजदूर युनियनचे सरचिटणीस अँड़ महाबळ शेट्टी यांनी सांगितले.

मनपाने कामगार-कर्मचारी अधिकार्‍यांसाठी बांधलेल्या सेवा निवासस्थानाची दुरुस्ती आणि देखभाल विनाविलंब व्हावी, धोकादायक इमारतीत राहणार्‍या कर्मचार्‍यांचे पुनर्वसन त्याच विभागात करावे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आवास योजना आणि श्रमसाफल्य योजनेनुसार कामगारांना मालकी हक्काने घरे, निवासस्थाने द्यावीत आदी मागण्यांसाठी म्युनिसिपल मजदूर युनियनच्या नेतृत्वाखाली सफाई कामगारांचे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS