२८ नोव्हेंबरपासून रिक्षांचा बेमुदत संप - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 November 2013

२८ नोव्हेंबरपासून रिक्षांचा बेमुदत संप

मुंबई : भाडेवाढीच्या प्रश्नावरून आता रिक्षावाल्यांच्या इतर मागण्यांवर लक्ष केंद्रित करून रिक्षांचा येत्या २८ नोव्हेंबरपासून मुंबईसह राज्यभर बेमुदत संप पुकारण्यात येणार आहे. सीएनजीसह इतर मागण्यांसाठी मुंबईसह राज्यातील सुमारे १५ लाख रिक्षांचे बेमुदत आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा मुंबई ऑटोरिक्षा मेन्स युनियनने दिला आहे. त्यामुळे आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी पुन्हा एकदा प्रवाशांना वेठीस धरण्यात येणार आहे.

मुंबईसह राज्यभर रिक्षाचालकांना सीएनजी गॅस भरण्यासाठी पंपावर मोठय़ा रांगा लावाव्या लागतात. त्यात त्यांचे ३-४ तास जातात. सीएनजी गॅसचा पुरवठा सुरळीत होत नाही, तो पुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी प्रमुख मागणी असल्याचे मुंबई ऑटोरिक्षा मेन्स युनियनने मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी सांगितले की, मुंबई शहरात खाजगी बसेस, ट्रॅव्हल्स, कॉल सेंटरच्या गाड्यांमधून मोठय़ा प्रमाणात प्रवासी वाहतूक केली जाते. रेल्वे स्टेशन ते घर अशी वाहतूक केली जात असल्यामुळे बेस्टच्या बसेस आणि रिक्षाचालकांना प्रवासी मिळत नाहीत. परिणामी त्यांचे आर्थिक नुकसान होते. याविषयी परिवहन आयुक्तांना ४ जुलै रोजी पत्र पाठविण्यात आले असून आजपर्यंत त्यावर कोणत्याही पद्धतीची कारवाई करण्यात आलेली नाही. त्याशिवाय राज्य सरकारने रिक्षाचालकांच्या कल्याणकारी मंडळासाठी जी समिती स्थापन केली आहे ती बरखास्त करून त्याजागी नवी समिती स्थापन करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. तसेच रिक्षाचालक एका वर्षाला सुमारे २८00 कोटी रुपये इन्शुरन्सचे भरतात, त्या रकमेचीच कल्याणकारी योजना राबवावी, अशीही मागणी केली आहे. मुंबईत एकूण ८४ सीएनजी भरणारे पंप असून त्यापैकी पश्‍चिम उपनगरात ५५, तर पूर्व उपनगरात फक्त २५ पंप आहेत. त्यामुळे ओएनजीसी कंपनीने स्वत: सीएनजीचा पुरवठा करावा आणि २४ तास सर्व्हिस द्यावी, अशीही मागणी या वेळी करण्यात आली आहे. या सर्व मागण्यांची पूर्तता येत्या १५ दिवसांत राज्य शासनाने केली नाही, तर येत्या २८ नोव्हेंबरपासून बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती शशांक राव यांनी दिली. या संपाची संपूर्ण जबाबदारी राज्य शासन आणि मुख्यमंत्र्यांची असेल, असेही राव यांनी सांगितले.
मागण्या१) मुंबईसह उपनगरात होणारी अवैध प्रवासी वाहतूक थांबवा.
२) सीएनजीचा मुबलक पुरवठा करण्यात यावा.
३) रिक्षा चालक-मालकांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात यावी.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS