जीवनदायी योजना राज्यभर करण्यासाठी सोनिया गांधी नागपूरमध्ये - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 November 2013

जीवनदायी योजना राज्यभर करण्यासाठी सोनिया गांधी नागपूरमध्ये

मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या नेतृत्वाखाली राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे राज्य पातळीवर लोकार्पण करण्यासाठी येत्या २१ नोव्हेंबर रोजी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी नागपूरच्या एकदिवसीय दौर्‍यावर येणार आहेत. निवडणुकांच्या तोंडावर विदर्भात येत असलेल्या सोनिया गांधी यांच्या जोरदार स्वागताची तयारी प्रदेश काँग्रेसने केली आहे.

या महत्त्वाकांक्षी व लोकोपयोगी योजनेचे २१ नोव्हेंबर २0१३ रोजी दुपारी ३ वाजता नागपूरच्या कस्तुरचंद पार्क येथे आयोजित कार्यक्रमात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हस्ते उद््घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी संपूर्ण विदर्भातून कार्यकर्ते व नागरिक नागपूरला येणार आहेत. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे विदर्भाच्या दौर्‍यावर आहेत. रविवारी दुपारी प्रदेशाध्यक्षांनी नागपूर येथे कार्यक्रम स्थळ असलेल्या कस्तुरचंद पार्कची पाहणी केली. राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. सुरेश शेट्टी, खासदार विलास मुत्तेमवार, दीनानाथ पडोळे, नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जयप्रकाश गुप्ता, नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना गावंडे, प्रदेश चिटणीस रामकिसन ओझा, के. के. पांडे, सुनील दुद्दलवार आदी नेते याप्रसंगी उपस्थित होते.

दरम्यान, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या स्वागताच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. माणिकराव ठाकरे यांनी नागपूर लगतच्या जिल्ह्यांमध्ये नेते, पक्ष पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका आयोजित केल्या आहेत. रविवारी सायंकाळी वर्धा येथे जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते आणि पदाधिकार्‍यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला खासदार दत्ता मेघे, राज्यमंत्री रणजित कांबळे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण उरकांदे, शेखर शेंडे, चारुलता ताई टोकस, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा हेमलता मेघे, प्रदेश सचिव प्रवीण हिवरे, जिल्हा परिषद अध्यक्ष नाना ढगे, सेवादलचे जिल्हाध्यक्ष प्रकाश डफ, जिल्हा महासचिव प्रदीप ठाकूर आदी नेते प्रामुख्याने उपस्थित होते. माणिकराव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सेमवारी अमरावती आणि नागपूर येथे बैठका होणार आहेत. याच पद्धतीने १९ नोव्हेंबर रोजी वाशिम व यवतमाळ येथेदेखील काँग्रेस नेते व पदाधिकार्‍यांच्या जिल्हास्तरीय बैठका आयोजित करण्यात आहेत, असे समजते. आठ जिल्ह्यांत लागू असलेली राजीव गांधी जीवनदायी योजना २१ नोव्हेंबरपासून राज्यभर अमलात येणार आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS