२0१७ नंतरच कल्याण-वाशी मार्ग - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 December 2013

२0१७ नंतरच कल्याण-वाशी मार्ग

23 December 2013 http://jpnnews.webs.com
मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे स्थानकाहून वाशी आणि पनवेलला जाणार्‍या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) कल्याण ते वाशी हा थेट मार्ग करण्याची घोषणा केली होती. परंतु हा मार्ग अस्तित्वात येण्यासाठी २0१७ पर्यंत या मार्गावरील प्रवाशांना वाट पाहावी लागणार आहे. 

मेन लाइनच्या प्रवाशांना वाशी किंवा पनवेलला जाण्यासाठी ठाणे येथून ट्रान्सहार्बर मार्गाने जावे लागते. त्यामुळे ठाणे स्थानकातील प्रवाशांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. त्यातच पिकअवरमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी होते. त्यामुळे कल्याण ते वाशी हा थेट मार्ग करण्यात येणार असल्याची घोषणा एमआरव्हीसीने केली होती. परंतु या मार्गाचे काम सुरू होण्यासाठी किमान २0१७ ची वाट पाहावी लागणार आहे. दिवा ते ठाणे स्थानकांदरम्यान पाचवी आणि सहावी रेल्वे लाइन टाकण्याचे काम पूर्ण झाल्याशिवाय कल्याण ते वाशी या मार्गाचे काम हाती घेण्यात येणार नसल्याची माहिती मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली. दिवा ते ठाणे स्थानकांदरम्यान टाकण्यात येणार्‍या पाचव्या-सहाव्या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण होण्यासाठी अजून किमान १ ते दीड वर्षाचा कालावधी आवश्यक आहे. त्यामुळे कल्याण ते वाशी मार्गाचे काम लांबणीवर पडणार आहे. 

कल्याण ते वाशी हा मार्ग मुंब्रा व कळवा या मार्गाने काढण्यात येणार आहे. कल्याण ते वाशी या लोकल गाड्या कळवा स्थानकापर्यंत पहिल्या आणि दुसर्‍या रेल्वे लाइनने येतील आणि त्यानंतर हा मार्ग ठाणे-वाशी मार्गावर जोडण्यात येणार आहे. त्यासाठी ठाणे येथे हार्बर मार्गावर वांद्रे स्थानकात असलेल्या पुलाप्रमाणे पूल बांधावा लागेल किंवो रुळांची जोडणी करूनही करता येणार आहे. या मार्गावर विटावा आणि दिघा ही दोन स्थानके उभारण्याची मागणी स्थानिक प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. परंतु या मार्गाचे काम हाती घेण्यासाठी २0१७ ची वाट पाहावी लागणार आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS