रेल्वे ट्रॅकची २४ तास अहोरात्र देखभाल आणि दुरुस्ती करणार्या गँगमनला आधुनिक वॉकीटॉकी आणि मोबाईल देण्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने ठरविले आहे. खास करून पावसाळय़ात उद्भवणार्या आपत्कालीन परिस्थितीशी सामना करण्यासाठी या आधुनिक वॉकीटॉकी आणि मोबाईलचा उपयोग होणार आहे. लांब पल्ल्याच्या मार्गावरील खास करून घाट मार्गात रेल्वे रुळाला तडे जाण्यापासून ते दरड कोसळल्यामुळे रेल्वेची वाहतूक विस्कळीत होते. त्यामुळे रेल्वे ट्रॅकवर काम करणार्या गँगमनच्या मदतीसाठी मोबाईल आणि वॉकीटॉकी देण्यात येणार आहे.
मध्य रेल्वे मार्गावरील कसारा ते इगतपुरी (१६ किमी) आणि कर्जत ते लोणावळा (२८ किमी) हा मार्ग घाटमार्ग आहे. या मार्गात गँगमन ट्रॅकच्या देखभाल-दुरु स्तीसाठी नेहमी गस्त घालत असतो. प्रत्येक गँगमनला तीन किमीप्रमाणे येऊन जाऊन प्रत्येक दिवशी १२ किमी ट्रॅकची तपासणी करायची असते. या मार्गावर होणार्या वाहतुकीची सर्व माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्यांना देण्याचे महत्त्वाचे काम गँगमनकडे असते. परंतु पावसाळय़ात मात्र रेल्वेच्या वाहतुकीविषयी माहिती देणे अशक्य असते. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने या मार्गावर काम करणार्या आपल्या गँगमनला मोबाईल आणि वॉकीटॉकी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आपत्कालीन स्थितीतही रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्यांना घाट मार्गातील रेल्वे ट्रॅकविषयी माहिती मिळण्यास मदत होणार आहे.


No comments:
Post a Comment