-शिष्यवृत्तीचे पैसे प्राचार्याने लुबाडले - प्राचार्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
- दहा वर्षांपासून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती नाही
मुंबई - 10/12/2013 - http://jpnnews.webs.com
मुंबई - मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणाची कवाडे खुली व्हावीत म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1945 मध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटीची मुहूर्तमेढ रोवली, परंतु ही संस्था बाबासाहेबांच्या उद्दिष्टांनाच हरताळ फासत आहे. मुंबईतील सिद्धार्थ महाविद्यालयात दहा वर्षे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती देण्यात येते. शिष्यवृत्तीचे पैसे केंद्र सरकार देते. मात्र, त्याची अंमलबजावणी राज्याचा समाजकल्याण विभाग करत असतो. शिष्यवृत्ती वाटप करण्याची जबाबदारी ही संबंधित महाविद्यालयाची असते.
फोर्ट परिसरात ‘पीपल्स’ची चार महाविद्यालये आहेत. त्यापैकी सिद्धार्थ अर्थशास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालय एक आहे. या महाविद्यालयात 11 ते पदवीपर्यंत वर्ग आहेत. या महाविद्यालयाची विद्यार्थी संख्या दोन हजारांच्या आसपास असते. समाजकल्याण विभागाने शिष्यवृत्तीचे पैसे वेळेत अदा केले होते, परंतु महाविद्यालयाने त्याचे विद्यार्थांना वाटपच केले नाही. विशेष म्हणजे 2001 ते 2010 या दहा वर्षांच्या काळात महाविद्यालयाने शिष्यवृत्तीत अनियमितता केली आहे. शिष्यवृत्ती देण्यास विलंब केल्यास किंवा अफरातफर केल्यास सामाजिक न्याय वित्तीय नियम 1959 कलम 53 अन्वये संबंधित शैक्षणिक संस्थेविरुद्ध दंडनीय कार्यवाही करण्यात येते. तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्यावर गुन्हा दाखल करण्यात येतो.
2001 ते 2010 या काळात सिद्धार्थ महाविद्यालयात शिष्यवृत्तीत अनियमितता झाली आहे. शिष्यवृत्तीत अफरातफर झालेली रक्कम आहे 12 लाख 3 हजार 300 रुपये एवढी आहे. या काळात महाविद्यालयाचे प्राचार्य कृष्णा पाटील हे होते. शिष्यवृत्तीची जबाबदारी प्राचार्याची असते. त्यामुळे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, असे आदेश राज्याच्या समाजकल्याण आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार मुंबई शहर सहायक आयुक्त यांनी आझाद मैदान पोलिस स्टेशनला पत्र पाठवले आहे. मात्र, पाटील यांनी या आरोपाचे खंडन केले आहे.
महाविद्यालय एक, प्राचार्य दोन
संस्था ताब्यात ठेवण्यावरून ‘पीपल्स’मध्ये आनंदराज आंबेडकर आणि रामदास आठवले यांच्यात संघर्ष सुरू आहे. त्यामुळे सिद्धार्थ महाविद्यालयाला दोन्ही गटांचे स्वतंत्र प्राचार्य आहेत. शिष्यवृत्तीची अफरातफर केल्याचा ज्यांच्यावर आरोप आहे ते कृष्णा पाटील आठवले गटाचे आहेत.


No comments:
Post a Comment