चवदार तळे शुद्धीकरणासाठी जैविक तंत्रज्ञानाचा वापर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 December 2013

चवदार तळे शुद्धीकरणासाठी जैविक तंत्रज्ञानाचा वापर

14/12/2013- http://jpnnews.webs.com (JPN NEWS website):
अलिबाग : डॉ. बाबासाहेब आबेडकरांनी दलितांसाठी खुले करून दिलेले आणि त्यांच्या लाखो अनुयायांचे तीर्थस्थळ असलेल्या महाडमधील चवदार तळ्याचे पाणी शुद्धीकरणाचा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. त्यासाठी जैविक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. जिल्हा नियोजन मंडळाच्या नावीन्यपूर्ण योजनेतून हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याचे पाणी दलितांसाठी खुले करण्यासाठी यशस्वी संघर्ष केला. २0 मार्च १९२७ रोजी चवदार तळ्याचे पाणी त्यांनी सत्याग्रह करून दलितांसाठी खुले करून दिले. तेव्हापासून चवदार तळे हे लाखो आंबेडकरी अनुयायांचे तीर्थक्षेत्र बनले. दरवर्षी आंबेडकर जयंती, महापरिनिर्वाण दिन आणि २0 मार्चचा क्रांतिदिन यादिवशी लाखो आंबेडकरी अनुयायी चवदार तळ्याला भेट देत असतात. या तळ्याचे पाणी ते तीर्थ म्हणूनही प्राशन करत असतात.वाढत्या नागरीकरणामुळे तसेच तळ्यातील पाण्याचा दैनंदिन वापर बंद झाल्याने तळ्याचे पाणी गेल्या काही वर्षांपासून पिण्यायोग्य राहिलेले नाही. अशा परिस्थितीत हे पाणी पिणे आरोग्यास अपायकारक ठरू शकते. ही बाब लक्षात घेऊन ओझोन तंत्रज्ञानाचा वापर करून तळ्याचे पाणी शुद्ध करण्यासाठी राज्य सरकारकडे महाड नगर परिषदेने प्रस्ताव पाठवला होता. अमृतसरमधील सुवर्ण मंदिराच्या धर्तीवर हा प्रकल्प राबवला जाणार होता, मात्र यासाठी जवळपास दीड कोटींचा खर्च अपेक्षित होता. शिवाय त्याच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च महाड नगर परिषदेला करावा लागणार होता. आर्थिक तरतूद न झाल्याने हा प्रस्ताव निकाली काढण्यात आला होता.आता रायगड जिल्हा नियोजन मंडळाच्या नावीन्यपूर्ण योजने अंतर्गत चवदार तळ्याचे पाणी शुद्ध करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. बायोसॅनिटायझर अर्थात जैविक शुद्धक संप्रेरकांचा यासाठी वापर केला जाणार आहे. यामुळे तळ्याचे पाणी नैसर्गिकरीत्या शुद्ध होणार असून त्यासाठी २५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यामुळे तळ्याच्या परिसरातील भूजलातील क्षारांचे प्रमाण कमी होणार असून जमिनीत पाणी जिरवण्याचे प्रमाण वाढून भूजल पातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे. परिसरातील हवादेखील शुद्ध होणार असून डासांची उत्पती थांबणार आहे. तलावात टाकण्यात येणार्‍या निर्माल्य व इतर कचर्‍याचे विघटन होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाण्यातील ऑक्सिजनच्या प्रमाणात वाढ होऊन नायट्रेटसारखी विषारी द्रव्ये निष्क्रिय होणार आहेत. पाण्यातील शेवाळ तसेच अन्य उपद्रवकारक वनस्पतींचा नायनाट होणार आहे.ठाण्यातील मासुंदा तलावात यापूर्वी असा प्रकल्प यशस्वीरीत्या राबवण्यात आला आहे. महाड नगर परिषदेने चवदारतळे शुद्धीकरणाचा या प्रकल्पाचा प्रस्ताव जिल्हा नियोजन मंडळाला सादर केला आहे. महाडचे प्रांताधिकारी रवींद्र हजारे यांनी या कामी पुढाकार घेतला आहे. नगर परिषदचे मुख्याधिकारी दीपक झिंजाणे आणि जिल्हा नियोजन अधिकारी राजेश तितर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ठाण्यातील मासुंदा तलावाला भेट देऊन प्रकल्पाची पाहणी केली आहे. त्यानंतरच चवदार तळे शुद्धीकरण प्रकल्पाबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली आहे. येत्या चार ते पाच महिन्यांत हा प्रकल्प मार्गी लागेल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे लवकरच चवदार तळ्याचे पाणी अधिकच रुचकर होणार आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS