मानखुर्दकरांचे रेल्वेविरुद्ध थेट पंतप्रधानांनाच साकडे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 December 2013

मानखुर्दकरांचे रेल्वेविरुद्ध थेट पंतप्रधानांनाच साकडे

मुंबई : हार्बर मार्गावर १२ डबा लोकल चालवण्यासाठी सध्या प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. मानखुर्द रेल्वे स्थानकाशेजारी महात्मा फुले नगर या वस्तीत राहणार्‍या नागरिकांच्या सोयीसाठी प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ खालून भुयारी मार्ग रेल्वे प्रशासनाने बांधून द्यावा, यासाठी जय मल्हार सेवा मंडळाने थेट पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पत्र पाठवून साकडे घातले आहे.

मानखुर्द रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ आणि ३च्या दरम्यान १९७५ सालापासून सुमारे २ हजार झोपड्यांची महात्मा फुले नगर ही लोकवस्ती आहे. येथे सुमारे ५ हजार लोक राहतात. वस्तीच्या तिन्ही बाजूला रेल्वे ट्रॅक, तर एका बाजूला नौदलाचे निषिद्ध क्षेत्र आहे. या भागातील नागरिकांना बाहेर पडण्यासाठी रेल्वेने कुठल्याही प्रकारे सुविधा दिलेली नाहीत. त्यामुळे येथील नागरिकांना रेल्वे ट्रॅक ओलांडण्याशिवाय दुसरा पर्याय राहात नाही. शाळकरी मुले, महिला, अपंग, वृद्ध आणि इतर नागरिकांना रस्त्यावर येण्यासाठी रेल्वे ट्रॅक ओलांडावा लागतो. त्यात अनेकांचा बळीही गेलेला आहे. त्यातच आता मानखुर्द स्थानकात १२ डबा लोकलसाठी प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यात आल्यानंतर येथील रहिवाशांचा येण्या-जाण्याचा मार्ग पूर्णपणे बंद होणार आहे. तसेच आग, अपघातासारख्या प्रसंगी रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्याही येथे पोहोचू शकणार नाहीत. त्याचबरोबर येथील नागरिकांना अंत्ययात्रेसाठीही पादचारी पुलावरूनच ये-जा करावी लागते. परिणामी त्याचा इतर प्रवाशांनाही नकळत त्रास होतो. तसेच येथे स्टेशनच्या कामासाठी मातीचा भराव करण्यात आल्यामुळे पावसाचे पाणी वाहण्याचे नैसर्गिक मार्ग बंद होणार असल्याने पावसाळय़ात येथील संपूर्ण वस्ती पाण्याखाली जाण्याचीही भीती येथील नागरिकांना वाटत आहे. मध्य रेल्वे प्रशासन स्थानिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे रहिवाशांसाठी प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ खालून रेल्वे प्रशासनाने भुयारी मार्ग बांधून द्यावा आणि नंतरच प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणाचे काम करावे, अशी मागणी करणारे पत्र थेट पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पाठवले आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS