25/12/2013 http://jpnnews.webs.com
मुंबई : मुंबईत ४ हजार ७७६ मोबाइल टॉवर असून त्यापैकी ३ हजार ६१८ मोबाइल टॉवर हे अनधिकृत असल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी भाजपाचे नगरसेवक विनोद शेलार यांनी गेले वर्षभर पाठपुरावा करून पालिकेला मुबंईतील आरोग्याला घातक मोबाइल टॉवर आणि अनधिकृत टॉवर याबाबतची माहिती जनतेसमोर उघड करण्यास भाग पाडले आहे. कारण पालिकेनेच अनधिकृत मोबाइल टॉवरची आकडेवारी जाहीर केल्याचे समजते. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत शाळा, रुग्णालये, इमारती, उड्डाणपूल, झोपडपट्टी आदी ठिकाणी एकूण ४ हजार ७७६ मोबाइल टॉवर असून त्यापैकी केवळ १ हजार १५८ अधिकृत आणि ३ हजार ६१८ टॉवर अनधिकृत असल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे यामध्ये वांद्रे, अंधेरी, मालाड, बोरिवली, माटुंगा, भायखळा आदी ठिकाणी सर्वात जास्त अनधिकृत मोबाइल टॉवर आढळले आहेत. दरम्यान, अनधिकृत मोबाइल टॉवरबाबतची माहिती मुबंई महानगरपालिकेने दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही शेलार यांनी केला आहे. विनोद शेलार यांनी ५ नोव्हेंबर २0१२ रोजी पालिका सभागृहात ६६ ब अन्वये मोबाइल टॉवरच्या विषयाला वाचा फोडली होती. त्यानतंर शेलार यांनी वर्षभर याप्रकरणी पाठपुरावा करून अनधिकृत टॉवरची माहिती मिळवली. दरम्यान, मोबाइल टॉवर आरोग्यास घातक असून अशाप्रकारे अनधिकृत टॉवरमुळे हा धोका वाढत चालल्याचे अनेक स्वयंसेवी संस्था सांगत आहेत.


No comments:
Post a Comment