'लोकप्रतिनिधी माहिती प्रणाली' ही प्रशासन व नगरसेवकांत दुवा ठरेल - महापौर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 December 2013

'लोकप्रतिनिधी माहिती प्रणाली' ही प्रशासन व नगरसेवकांत दुवा ठरेल - महापौर

मुंबई : नगरसेवकांना आपापल्या प्रभागातील तक्रारी, नागरी प्रकल्पांची आणि अर्थसंकल्पाची माहिती ऑनलाईन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने 'लोकप्रतिनिधी माहिती प्रणाली'ची निर्मिती करण्यात आली आहे. महापालिका प्रशासन व नगरसेवकांमध्ये ही प्रणाली दुवा म्हणून काम करणार असल्याचे प्रतिपादन महापौर सुनील प्रभू यांनी उद््घाटनसमयी केले.

लोकप्रतिनिधी माहिती प्रणाली महापालिकेच्या सॅप प्रणालीशी जोडण्यात आली असून नगरसेवकांना आपापल्या प्रभागातील तक्रारीची, प्रभागातील प्रकल्पाची तसेच प्रभाग समितीनिहाय अर्थसंकल्पाची इत्यंभूत व विस्तृत माहिती या प्रणालीद्वारे मिळणार आहे. अर्थसंकल्पामध्ये सर्वसाधारण अर्थसंकल्प, विभाग व प्रभागनिहाय माहिती याद्वारे मिळणार आहे. त्यासोबतच तक्रारीचा पाठपुरावा करण्यासाठी संबधित अधिकार्‍यांना पत्र लिहणे, त्यासंदर्भातील कामाचे प्रगती दर्शवणारे छायाचित्र अपलोड करणे, संदेश (एसएमएस) सुविधा, ई-मेल सुविधा आदी सुविधा या प्रणालीद्वारे नगरसेवकांना उपलब्ध होणार आहे. 

ही प्रणाली हाताळण्याचे प्रभागनिहाय प्रशिक्षण नगरसेवकांसाठी लवकरच आयोजित करण्यात येणार असून प्रशिक्षणानंतर लगेचच नगरसेवक या प्रणालीचा वापर करू शकणार आहेत. त्याचप्रमाणे या प्रणालीमध्ये आपत्कालीन परिस्थितीत उद्भवल्यास प्रभागनिहाय रस्त्याचे नकाशे, अग्निशमन सेवा, रुग्णालयाची माहिती देण्यात आली आहे. त्यासोबतच नगरसेवकांना आपापल्या प्रभागातील माहिती संकलित करण्यासाठी वेगळय़ा फोल्डरची सुविधा याप्रणालीमध्ये पुरविण्यात आली आहे. ज्याद्वारे नगरसेवकांना आपल्या रेकॉर्डमधून जुने दस्ताऐवज शोधण्यात मदत होणार आहे. नगरसेवकांना आपल्या प्रभागात विकासकामांसाठी किती निधी खर्च झाला व किती निधी शिल्लक आहे याची इत्यंभूत माहितीही यातून मिळणार असून इलेक्टॉनिक नोंद ठेवता येणे या प्रणालीद्वारे सुलभ होणार आहे. ज्याद्वारे नगरसेवकांना आपल्या कामाचा पाठपुरावा संबंधित विभागाकडे करण्यास मदत होणार आहे.

या प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी सभागृह नेता असल्यापासून पाठपुरावा केला होता. आज खर्‍या अर्थाने त्याची अंमलबजावणी होत असल्याने स्वप्न सत्यात उतरले असल्याचे महापौरांनी सांगितले. नगरसेवकांना देण्यात आलेल्या लॅपटॉपचा सुयोग्य वापर होऊन त्याचा जास्तीत जास्त लाभ नगरसेवक व नागरिकांना व्हावा यासाठी सतत प्रयत्न सुरू होता. या प्रणालीद्वारे महापालिकेच्या कामाची पारदर्शकता नागरिकांना कळणार असून महापालिकेचे कामकाज पेपरलेस होण्यामध्ये ही प्रणाली महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे महापौरांनी सांगितले. नगरसेवकांनी या प्रणालीचा जास्तीत लाभ करून घेऊन आपले काम गतिमान करावे, अशी सूचना महापौरांनी सर्व नगरसेवकांना केली आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS