14/12/2013- http://jpnnews.webs.com ( JPN NEWS website )
मुंबई - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी उठसूट आदिवासी, दलितांच्या घरी जात कळवळ्याचे जाहीर प्रदर्शन करत असतात. राहुल यांना गोरगरिबांचा इतका पुळका आहे, तर त्यांनी दलित मुलीशी विवाह करावा, असा अजब सल्ला रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी राहुल यांना दिला आहे. यशवंतराव चव्हाण सभागृहात गुरुवारी रिपाइं युवक मेळाव्याचे आयोजन केले होते. या वेळी ते बोलत होते.
राहुल यांचे नेतृत्व लोकांनी झुगारल्याचे चार राज्यांच्या निकालात दिसून आले आहे. काँग्रेस बुडतं जहाज आहे. त्याला आता कोणीच तारू शकणार नाही, असा इशारा देत राहुल गांधी यांनी दलित मुलीशी विवाह केला तर त्यांना गोरगरिबांचा पुन्हा एकदा पाठिंबा मिळेल, अशी भविष्यवाणी त्यांनी केली. दलित चळवळीने आजपर्यंत नकारात्मक राजकारण केले. त्यामुळे विविध सामाजिक गट आमच्यापासून दुरावले. राजकारणातील ती नकारात्मकता संपवण्यासाठी रिपाइंने शिवसेनेशी घरोबा केला, असे त्यांनी सांगितले. सोनियांनी पंतप्रधान पद नाकारायला नको होते. सोनिया पंतप्रधान झाल्या असत्या तर देशातील आजचे चित्र वेगळे ठरले असते, असे नमूद करत शरद पवार यांचे सोनियाविरोधी बंड साफ चुकीचे होते, असा टोला त्यांनी या वेळी लगावला.
‘आप’चे अभिनंदन
आम आदमी पार्टीने दिल्ली निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवल्याबद्दल ‘आप’चे त्यांनी अभिनंदन केले. असे यश रिपाइं का मिळवू शकत नाही, याविषयी कार्यकर्त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. तसेच ‘आप’च्या यशात निधीचा मोठा वाटा आहे, अशी टिप्पणी त्यांनी केली.


No comments:
Post a Comment