मुंबईत ९ हजार मुले रोज झोपतात रिकाम्या पोटी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 December 2013

मुंबईत ९ हजार मुले रोज झोपतात रिकाम्या पोटी

5/12/2013 http://jpnnews.webs.com
मुंबई : मुंबईत तब्बल ९ हजार मुले रोज रिकाम्या पोटी झोपत असून तितकीच मुले शाळेतही जात नसल्याची धक्कादायक बाब एका सर्वेक्षणादरम्यान उघड झाली आहे. ६ ते १४ वयोगटापर्यंतच्या प्रत्येक मुलाला शिक्षण मिळालेच पाहिजे, असे केंद्र सरकारने शिक्षण हक्क कायद्याचा हवाला देत जाहीर केले खरे, मात्र हा कायदा म्हणजे एक फार्सच ठरला असल्याचा आता आरोप होत आहे.टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्स आणि अँक्शन एड इंडिया या संस्थांमधील विद्यार्थ्यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार मुंबईत ३७ हजार ५९ पेक्षा अधिक मुले ही रस्त्यावर राहातात. यातील कमीत कमी ९ हजार मुले रोज रिकाम्या पोटी झोपतात तर तितकीच मुले ही शाळेतदेखील जात नाहीत. यावरून भारताचे तरुण भविष्य कसे अंधाराच्या गर्तेत अडकले आहे, याचा अंदाज येऊ शकतो. सन २0१२-१३ च्या जणगणनेत १00 हून अधिक कार्यकर्ते कामात गुंतले होते. त्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत रस्त्यांवर राहाणार्‍या बालकांची संख्या लक्षणीय आहे. मुंबईतील २४ वॉर्डांमधील ३६ हजार १५४ मुले ही रस्त्यावर राहात असून ९0५ मुले ही मुंबईतील विविध रेल्वे फलाटांवर राहात आहेत. दरम्यान, हा आकडाही खरा नसून यापेक्षा अधिक मुले मुंबईत राहात होती; परंतु २६/११ च्या हल्ल्यानंतर यातील अनेक मुले सुरक्षिततेच्या कारणास्तव इतर शहरांमध्ये गेल्याचे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. यातील अनेक मुलांचे आयुष्य अतिशय वाईट वळणावरून जात असून त्यातील १५ टक्के मुले ही अमली पदार्थांच्या आहारी गेली आहेत. तर अनेक मुले ही बुट पॉलिशसारखी छोटी-मोठी कामे करून जीवन कंठत आहेत. अनेक मुले ही गुन्हेगारीकडे वळल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS