24/12/2013 http://jpnnews.webs.com
| मुंबई : उपनगरीय रेल्वेने प्रवास करीत असताना रेल्वेचे तिकीट काढणे, ही एक मोठी डोकेदुखी बनत चालली आहे. रेल्वे स्थानकांवर असणार्या तिकीट खिडक्या रेल्वेकडे मनुष्यबळ कमी असल्यामुळे बंद असतात. त्यामुळे तिकिटांसाठी होणारी गर्दी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यातच सीव्हीएम कुपन्सच्या मशिन्स बंद असल्यामुळे कुपन्सवर रेल्वेचा स्टॅम्प मारण्यासाठी प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मुंबईतील सुमारे ७0 लाख प्रवासी दररोज उपनगरीय रेल्वेने प्रवास करतात. त्यापैकी मध्य रेल्वेच्या मार्गावर सुमारे ३८ लाख आणि पश्चिम रेल्वे मार्गावर सुमारे ३२ लाख प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी रांगेत उभे राहावे लागू नये म्हणून रेल्वे प्रशासनाने सीव्हीएम कुपन्स, एटीव्हीएम असे पर्याय आणले, परंतु सध्या मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर सीव्हीएम आणि एटीव्हीएम मशिन्सची अवस्था चांगली नाही. अनेक स्थानकांवर फक्त नावाला सीव्हीएम आणि एटीव्हीएम मशिन्स पाहायला मिळतात. त्यामुळे तिकीट खिडक्यांवरील रांगा वाढतच आहेत. त्यातच रेल्वे प्रशासनाकडे मनुष्यबळ नसल्यामुळे उपलब्ध असलेल्या सर्व तिकीट खिडक्या ते चालू करू शकत नाहीत. त्यामुळे सध्या प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे. मध्य रेल्वेच्या मेन लाईन आणि हार्बर मार्गावर एकूण ४२९ अनारक्षित तिकीट खिडक्या आहेत. त्यापैकी ३५५ खिडक्या दररोज बंद असतात. म्हणजेच फक्त १२ ते १३ टक्के तिकीट खिडक्या आजच्या घडीला मध्य रेल्वे मार्गावर सुरू आहेत. त्याचबरोबर सुमारे ३५0 एटीव्हीएम मशिन्स उपनगरीय रेल्वे मार्गावर बसवण्यात आल्या आहेत. त्यापैकी १७५ मशिन्स कार्यरत आहेत, तर उर्वरित अनेक स्थानकांवर त्या नादुरुस्त अवस्थेत आहेत. सीव्हीएम कुपन्ससाठी १ एप्रिल २0१२ पासून रांग लावणे आवश्यक असल्यामुळे आणि सीव्हीएम कुपन्स पंच करण्याची मशिन्स बंद असल्यामुळे तोही पर्याय प्रवाशांना फारसा उपयोगी पडत नाही. सध्या मध्य रेल्वे मार्गावर ९ लाख तिकिटे दररोज विकली जातात. त्यापैकी ६ लाख तिकिटे तिकीट खिडक्यांवर, २ लाख सीव्हीएम कुपन्सच्या आधारे, तर १ लाख तिकिटे ही एटीव्हीएमच्या सहाय्याने विकली जातात. |


No comments:
Post a Comment