24/12/2013 http://jpnnews.webs.com
| मुंबई : मुंबई महापालिकेतील उपायुक्त (अंभियांत्रिकी गट) व संचालक (अंभियांत्रिकी सेवा व प्रकल्प) ही रिक्त पदे एमपीएससीमार्फत (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) भरण्यास सोमवारी विधी समिती बैठकीत शिवसेना, भाजपा, मनसेच्या नगरसेवकांनी तीव्र विरोध केला. यासंदर्भातील प्रस्ताव विधी समितीने रेकॉर्ड केला. मुंबई महापालिकेतील उपायुक्त (अंभियांत्रिकी गट) या संवर्गातील अ.जा. प्रवर्गासाठी आरक्षित असलेले पद पदधारकाच्या सेवानवृत्तीमुळे ऑगस्ट २0१0 पासून रिक्त आहे. तसेच संचालक (अंभियांत्रिकी सेवा व प्रकल्प) हे पद पदधारकाच्या सेवानवृत्तीमुळे १ मे २0१२ पासून रिक्त झाले आहे. ही दोन्ही पदे एमपीएसीमार्फत भरण्याचे २ प्रस्ताव सोमवारी पालिका समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी आले होते. याप्रसंगी भाजपाचे विनोद शेलार, ज्ञानमूर्ती शर्मा, शिवसेनेचे रमाकांत रहाटे, मनसेचे प्रकाश दरेकर आदींनी दोन्ही पदे एमपीएससीमधून भरण्यास कडाडून विरोध करत प्रस्ताव रेकॉर्ड करण्याची मागणी लावून धरली व अखेर विधी समिती अध्यक्ष मकरंद नार्वेकर यांनी प्रस्ताव रेकॉर्ड केले. तसेच ही दोन्ही पदे पालिकेतील सेवाज्येष्ठतेनुसार भरण्याची मागणी केली. याप्रसंगी बोलताना भाजपाचे नगरसेवक विनोद शेलार यांनी पालिकेत एमपीएससीमधून रिक्त पदे का भरायची? पालिकेतील अनुभवी अधिकार्यांना सेवाज्येष्ठतेचा लाभ देऊन ही पदे भरावी, अशी मागणी केली. यासंदर्भातील पालिकेचे धोरण चुकीचे आहे. ज्या उपायुक्त (अंभियांत्रिकी गट) पदासाठी राकेश मैनदकर यांची नियुक्ती करायची आहे, त्यांचे रहेजा, ओबेरॉय व एलअँण्डटी आस्थापनात काम करतानाचे वेतन १.७0 लाखापर्यंत आहे. ते पालिकेत केवळ ३0-४0 हजार रुपये वेतनात काम का व कशासाठी करणार? येथे महापालिकेत त्यांना असा कोणता मोठा आर्थिक लाभ होणार आहे? अशी शंका व्यक्त करत विनोद शेलार यांनी प्रशासनाना चांगलेच फैलावर घेतले. तसेच मनसेचे प्रकाश दरेकर यांनीही एमपीएससीमधून पालिकेतील रिक्त पदे न भरता सेवाज्येष्ठतेनुसार पदांचा लाभ पालिका अधिकार्यांना द्या, अशी मागणी केली. बाहेरून पदे भरल्यास पालिकेच्या अधिकार्यांची निराशा होऊन मोठे खच्चीकरण होईल. यापूर्वी राजेंद्र भोसले, भिसे, आता राजेश काटकर यांची एमपीससीमधून नियुक्ती केल्याने महापौर व नगरसेवकांच्या अधिकारावर गदा येत आहे. सुखटणकर समितीच्या शिफारशीनुसारच पालिकेतूनच सेवाज्येष्ठतेनुसार पदे भरावीत. ज्याप्रमाणे विजयसिंह पाटणकर यांची उपायुक्त पदावरून अतिरिक्त आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली, त्याप्रमाणे पाटणकर पॅटर्नचा वापर करावा? शिवसेनेचे रमाकांत रहाटे यांनीही एमपीएससीमधून पालिकेची रिक्त पदे भरण्यास विरोध दर्शवला. आयुक्त व शासनाची दादागिरी सहन करणार नाही. पालिकेतील अधिकार्यांना जास्त, तर एमपीएससीच्या अधिकार्यांना कमी अनुभव आहे. अखेर यासंदर्भातील प्रस्ताव एकमताने रेकॉर्ड करण्यात आला. |


No comments:
Post a Comment