27/12/2013 http://jpnnews.webs.com
मुंबई : मुंबईतील पे अँण्ड पार्कचा दरवाढीचा प्रस्ताव गुरुवारी सुधार समितीच्या बैठकीतील सत्ताधारी शिवसेना-भाजपाच्या सदस्यांनी बहुमताने मंजूर केला, मात्र विरोधी पक्षाने या प्रस्तावाला जोरदार विरोध करत प्रस्ताव फाडून सभात्याग केला. त्यामुळे सुधार समिती बैठकीत गुरुवारी अभूतपूर्व गोंधळाचे वातावरण होते.
पे अँण्ड पार्कच्या दरवाढीच्या प्रस्तावाला मागील बैठकीत शिवसेना-भाजपाने जोरदार विरोध केला होता. वास्तविक या पे अँण्ड पार्किंगच्या प्रस्तावाला सुधार समितीकडून मंजुरी मिळाली असली तरी अद्यापि महापालिका सभागृहात मंजुरी मिळालेली नाही. पे अँण्ड पार्कच्या प्रस्तावात पार्किंगच्या दरात वाढ करण्यात आली असून रस्त्यालगत वा सोसायटीसमोरील पार्किंगचे शुल्क आकारले जाणार आहे. मुंबईत पालिकेच्या पे अँण्ड पार्कच्या कंत्राटदारांची मुदत ५ डिसेंबर २0१४ ला संपणार आहे. या वेळी प्रस्ताव मंजूर करण्यापूर्वी विरोधी पक्षाने सत्ताधारी चुकीच्या पद्धतीने प्रस्ताव मंजूर करून मुंबईकरांवर पार्किंग शुल्कातील दरवाढ लादत असल्याचा आरोप केला.
याप्रसंगी शिवसेनेचे सुरेंद्र बागलकर यांनी पे अँण्ड पार्किंग दरवाढीचे सर्मथन केले. या वेळी चर्चेत मोहसीन हैदर, अनिल पाटणकर, वैष्णवी सरफरे, ज्ञानमूर्ती शर्मा यांनी सहभाग घेतला. पार्किंग दरवाढ शहर, पश्चिम उपनगर,पूर्व उपनगर अशी होणार असून दुचाकी वाहनासाठी शहरात जुने २ रुपये असून आता नवीन दरानुसार १५ रुपये आकारले जाणार आहेत. पश्चिम उपनगरात १0 रुपये तर पूर्व उपनगरात ५ रुपये आकारले जाणार आहेत, तर चारचाकी वाहनांसाठी जुने दर १५ रुपये होते. नवीन दरानुसार शहरात ६0 रुपये, पश्चिम उपनगरात ४0 रुपये तर पूर्व उपनगराकरिता २0 रुपये आकारले जाणार आहेत.


No comments:
Post a Comment