इंदू मिलचे श्रेय लाटण्यासाठी धडपड - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 December 2013

इंदू मिलचे श्रेय लाटण्यासाठी धडपड

5/12/2013 http://jpnnews.webs.com
इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक करण्यासाठी मिलची १४ एकर जागा देण्याचा निर्णय अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने यापूर्वीच घेतला असून जमीन हस्तांतरणाबाबत राजकारण केले जात आहे आणि निव्वळ श्रेयासाठी धडपड चालू आहे, असा सणसणीत टोला भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड़ प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी बुधवारी लगावला. दैनिक 'पुण्य नगरी' कार्यालयास अँड़ आंबेडकर यांनी बुधवारी सदिच्छा भेट दिली. त्या वेळी संपादकीय विभागाशी संवाद साधताना विविध विषयांवर परखड मत व्यक्त केले.

वाजपेयी सरकारने घेतलेला निर्णय फाईलवर कायम असताना संसदेच्या मंजुरीची भाषा करणे अवास्तव आहे, अशी टीका करून आंबेडकर म्हणाले की, जमिनीची एक तृतीयांश जागा राज्य सरकारची, एक तृतीयांश म्हाडाची आणि एक तृतीयांश केंद्र सरकारची असताना संपूर्ण जमिनीसाठी केंद्राला साकडे घालणे व्यर्थ आहे. वेगवेगळ्या पक्षांचे नेते आंदोलन करण्याची तसेच भूमिपूजने करण्याची आणि ताबा घेण्याची भाषा करत आहेत. प्रत्यक्षात स्मारकाबाबत कोणीही सखोल विचार केलेला नाही. केवळ शोभेची वास्तू, पुतळा आणि उद्यान उभारण्याचा त्यांचा विचार दिसतो आहे. 

संपूर्ण देशात आंतरराष्ट्रीय दर्जाची संशोधनात्मक तसेच शैक्षणिक गुणवत्तावाढीस आवश्यक असणारी आंतरराष्ट्रीय दर्जाची एकही अँकॅडमिक इन्स्टिट्युट नाही. मुंबइसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहरात अशा प्रकारची वास्तू उभारली गेली पाहिजे. त्यासाठी दरवर्षी किमान एक हजार कोटी रुपयांची तरतूद करणे आवश्यक आहे. हा खर्चाचा बोजा केंद्र आणि राज्य सरकारने मिळून उचलला पाहिजे. त्याचप्रमाणे या संस्था मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असाव्यात आणि त्यात केंद्रातील शिक्षण आणि संशोधन संबंधित मंत्र्यांचा तसेच विविध विषयांतील तज्ज्ञांचा समावेश असावा. या संस्थेमध्ये देशविदेशातील तज्ज्ञांनी येऊन मार्गदर्शन करावे, अशाप्रकारे संस्थेची परिपूर्ण रचना केली पाहिजे. 

ॅ विद्यापीठ नामांतराचे धोरण ठरवावे
पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फु ले यांचे नाव देताना त्यात पुण्याचा उल्लेख असावा की, नसावा या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. त्यासंदर्भात विचारले असता प्रत्येक विद्यापीठाच्या नामांतराच्या वेळी आंदोलने होऊ लागली आहेत. प्रत्यक्षात विद्यापीठाला महापुरुषांचे नाव देण्याबाबत शासनाने धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे. औरंगाबाद विद्यापीठाच्या नामांतरावरून किती मोठा वाद झाला, हे सर्वांना माहिती आहे. त्यात मराठवाडा हे नाव घालावे लागले. आता देखील पुणे, सोलापूर, गडचिरोली, नागपूर या विद्यापीठांच्या नामकरणावरून वाद सुरू आहेत. धोरणाच्या अभावामुळे कोणीही ऊठसूठ नामांतराबाबत वाद उपस्थित करत आहेत आणि आंदोलनही करत आहेत.

ॅ तिसरी आघाडीच निर्णायक राहील
लोकसभा निवडणुकीनंतर कें द्र सरकार स्थापन करताना प्रादेशिक पक्षांचीच भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे भाकित करून भाजपाचे राष्ट्रीय प्रचारप्रमुख नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व केवळ एका राज्यापुरते सीमित असून देशाचा अभ्यास नसल्याने त्यांना संपूर्ण सर्मथन मिळू शकणार नाही, असे स्पष्ट मत आंबेडकर यांनी व्यक्त केले. नरेंद्र मोदी हे केवळ गुजरातमधील विकासाचा गाजावाजा करत आहे. त्यांचा हा मुद्दा राष्ट्रीय पातळीवर प्रभावी ठरणार नाही. खरे तर काँग्रेसनेच मोदी विरोधाची कट्टर भूमिका घेतलेली दिसत नाही. काँग्रेसमध्ये अनेक विद्वान नेते आहेत. मोदींना उघडे पाडणे त्यांना कठीण नाही; परंतु इच्छाशक्तीचा अभाव असल्याने काँग्रेसलाच त्याचा फटका बसणार आहे. काश्मीरमध्ये ३७0 कलम लागू करण्याची भाषा मोदी करत आहे. मग कच्छचे काय? असा प्रश्न काँग्रेस विचारू शकत नाही का? असा सवाल आंबेडकर यांनी केला. पंतप्रधानपदासाठी प्रादेशिक पक्षातून नेतृत्व पुढे येऊ शकते. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, प. बंगालच्या ममता बॅनर्जी, तामिळनाडूच्या जयललिता, आंध्रचे जगन्नाथ रेड्डी, तसेच उत्तर प्रदेशचे मुलायमसिंग यांच्या रूपाने प्रादेशिक नेतृत्व पुढे आले आहे. भाजपाचा खरा आधार धर्मावर आधारित असला तरी मतांचे ध्रुवीकरण होणार आहे. विशेत: समाजवादी पक्षाकडे मुस्लीम मतांकडे विशेष पॉकेट म्हणून पाहिले जाते. मुस्लीम मतांच्या जोरावर काँग्रेस सत्तेचे स्वप्न रंगवत असले तरी समाजवादी पार्टी, वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया यांच्यात मुस्लीम मते विभागली जाणार आहे. त्यामुळे कोणा एका पक्षाबरोबर अल्पसंख्याक समाज आहे, असे म्हणणे योग्य ठरणार नाही.

ॅ राहुल गांधींचे लाँचिंग चुकीचे 
काँग्रेसतर्फे पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी यांचे नाव जरी पुढे आले असले तरी त्यांचे नेतृत्व कितपत स्वीकारले जाईल, हा एक प्रश्न आहे. मुळात राहुल गांधी यांचे लाँचिंग चुकीचे झाले आहे. ज्या बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये पक्षाचा जनाधार कमी झाला आहे, अशा राज्यांमध्ये राहुल यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या गेल्या. वाळवंटात पाण्यासाठी खोदकाम करण्यासारखा प्रकार झाला. त्यामुळे पक्षाचा अपेक्षाभंग झाला. आज काँग्रेस पक्षाकडे राष्ट्रीय स्तरावर प्रभावी नेतृत्व उरले नाही. नेतृत्वाबाबत काँग्रेसमध्ये मतभिन्नता आहे; पण ती उघडपणे समोर येत नाही. हीच परिस्थिती भाजपामध्ये देखील आहे. नरेंद्र मोदींना भाजपामधून कोणाचेही सर्मथन नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका गटाचे त्यांना सर्मथन आहे. मोदींचे प्रचारतंत्र हिटलरशाहीकडे नेणारे असल्याने हे नाणे लोकशाहीत चालणारे नाही, असे त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीची मिनी फायनल म्हणून पाहिल्या जाणार्‍या राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, मिझोरम या पाच राज्यात काँग्रेसला अपेक्षित यश मिळेल, अशी शक्यता दिसत नाही, असे सांगून आंबेडकर म्हणाले की, या पाच राज्यांत काँग्रेसला अपेक्षित निकाल लागला नाही तर काँग्रेसचे पानिपत झाल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रातही तिसरी आघाडी सक्रीय होऊन तिला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ॅ डॉ. दाभोळकरांचा खून बुवाबाजीच्या दुकानदारांकडून 
डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येबाबत बोलताना अँड़ आंबेडकर म्हणाले, धर्माच्या प्रचारात घुसलेल्या धंदेवाईक लोकांनी हा खून केला असावा दाभोळकरांच्या कामामुळे त्यांच्या बुवाबाजीला आळा बसणार होता. ज्या लोकांनी धर्माच्या नावाखाली बुवाबाजीची दुकाने थाटली. त्यांचा हात डॉ. दाभोळकरांच्या खुनामागे असण्याची शक्यता आहे. दाभोळकरांच्या खुनानंतर धर्मांध संघटनांनी 'तुमचा दाभोळकर करू' अशा घोषणा त्यांनी दिल्या होत्या, याचे स्मरण आंबेडकरांनी करून दिले. दाभोळकरांच्या मारेकर्‍यांना पकडण्यात पोलिसांना अपयश येत आहे. या प्रश्नावर ते म्हणाले, पोलिसांमध्ये दोन वर्ग आहेत. त्यातील एक वर्ग धर्मांध शक्तीला मानणारा आहे. आपण जर 'त्या' लोकांपुढे आणले तर आपला धर्म बदनाम होईल, असे वाटत असावे, त्यामुळे या खुनामागे सूत्रधारांचा शोध घेण्यात व्यत्यय येत असावा. 

ॅ आठवलेंनी अस्तित्वाचा विचार करावा
भीमशक्ती - शिवशक्ती बोलताना आंबेडकर यांनी आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी अगोदर आपल्या पक्षाचे अस्तित्व किती राहिले याचा विचार करावा. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ही महायुती होऊनही आरपीआयच्या हाती काही लागले नाही. रिपब्लिकन ऐक्याची घोषणा अधूनमधून होत असली तरी आता या सर्व गटांची ताकद किती उरली याचा विचार करावा लागेल. त्यामुळे हा प्रयोग करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

ॅ अकोला जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन होईल 
नुकत्याच झालेल्या अकोला जिल्हा परिषदेत ५३ जागांपैकी २३ जागा मिळाल्या आहेत. यामध्ये ४ अपक्ष निवडून आले आहेत. त्यापैकी ३ सदस्य आमच्या पक्षाशी संबंधित आहे. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यात फारशी अडचण येणार नाही. सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसने मदतीचा हात पुढे केला आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केलेली लोकोपयोगी कामे, उमेदवारी देताना जाती धर्मा पलीकडे जाऊन केलेला विचार व जनतेचा आमच्या कामावरती असलेला विश्‍वास यामुळे अकोल्यात तिसर्‍यांदा सत्तेची संधी मिळाली.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS