मुंबई : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ५७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महापालिकेने सर्व प्रकारची तयारी केली आहे. यासंबंधीच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन महापौर सुनील प्रभू यांच्या हस्ते गुरुवारी शिवाजी पार्क येथील स्वागत कक्षात करण्यात येणार आहे.
महापरिनिर्वाण दिनासाठी महापालिका प्रशासनाद्वारे देश-विदेशातून येणार्या अनुयायांसाठी चैत्यभूमी तसेच शिवाजी पार्क परिसरात विविध सेवा-सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने शिवाजी पार्क मैदान येथे आंबेडकरी अनुयायांसाठी अंदाजे १ लाख चौरस फूट इतक्या आकाराच्या तात्पुरत्या निवार्याची व्यवस्था, शिवाजी पार्क नियंत्रण कक्षाशेजारी, सूर्यवंशी सभागृह मार्ग, चैत्यभूमी, तोरणा गेटजवळ, सेनापती बापट यांच्या पुतळ्याशेजारी व केळुसकर मार्ग (दक्षिण) चौपाटी अशा ३ ठिकाणी रुग्णवाहिकेसहित आरोग्य सेवा या सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. शिवाजी पार्क मैदानात वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येकी १0 शौचकूप असणारी १२ फिरती शौचालये, रांगेत असणार्या अनुयायांसाठी प्रत्येकी १0 शौचकूप असणारी ५ फिरती शौचालये, इंदू मिलच्या पाठीमागे १५0 बंदिस्त शौचालये तसेच पुरुष आणि महिलांसाठी प्रत्येकी १२५ अशी एकूण २५0 स्नानगृहाची तात्पुरती सुविधा, प्रथमोपचार केंद्र, पिण्याच्या पाण्याच्या २७0 नळांची व्यवस्था, रांगेत आणि परिसरात असणार्या अनुयायांसाठी १५ पिण्याच्या पाण्याचे टँकर्स, संपूर्ण परिसरात महापालिका कर्मचारी आणि वाहतूक व्यवस्थेमार्फत स्वच्छता, संपूर्ण परिसरात विद्युत व्यवस्था, अग्निशमन दलामार्फत आवश्यक ती अग्निशमन व्यवस्था, अग्निशमन दलामार्फत चैत्यभूमीलगतच्या चौपाटीवर सुरक्षा रक्षकांसहित बोटींची व्यवस्था करण्यात आली आहे.
चैत्यभूमीतील आदरांजली प्रसंगांचे केबल दूरचित्रवाहिनीमार्फत चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क येथे मोठय़ा आकाराच्या पडद्यावर थेट प्रक्षेपण, शिवाजी पार्क येथे ४६९ स्टॉल्सची रचना, वडाळा, दादर (पूर्व) येथील डॉ. आंबेडकर महाविद्यालयात २ हजार चौरस मीटर क्षेत्रफळ जागेवर तात्पुरत्या निवार्याची व्यवस्था, सोबत फिरती शौचालये, स्नानगृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि वैद्यकीय कक्ष, जी/उत्तर, दादर (पश्चिम) रेल्वे स्थानकाजवळ आणि एफ/उत्तर, दादर (पूर्व) स्वामी नारायण मंदिराजवळ नियंत्रण कक्ष / माहिती कक्ष, फिरती शौचालये, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था समवेत वैद्यकीय कक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान (राजगृह) येथे नियंत्रण कक्ष, वैद्यकीय सेवा कक्ष, 'एल' विभाग कुर्ला टर्मिनस परिसरात नियंत्रण, आरोग्य सेवा कक्ष, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच स्काऊट हॉल येथे भिक्खूनिवासाची व्यवस्था यांचा या विविध सेवासुविधांमध्ये समावेश आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस आणि महापालिका प्रशासनाकडून योग्य ती सर्व खबरदारी घेण्यात आली आहे.
शिवाजी पार्क परिसरात अनुयायांची होणारी गर्दी लक्षात घेऊन कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता मुंबई पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात ठेवला आहे. ३ उपायुक्त, २ सहाय्यक पोलीस आयुक्त, १२ पोलीस निरीक्षक, २२ सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक, ३९ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, ५३३ पोलीस अंमलदार व ४४ महिला पोलीस अंमलदार तसेच एसआरपीएफच्या ४ तुकड्या, बॉम्बशोधक व नाशक पथकाची २ पथके याशिवाय साध्या वेशातील १०० कर्मचारी तैनात असणार आहेत. ठिकठिकाणी वॉचर, छेडछाडविरोधी पथके आणि सोनसाखळी चोरीविरोधी पथके सर्वत्र नजर ठेवून असतील.


No comments:
Post a Comment