1/1/2014 http://jpnnews.webs.com
मुंबई : राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग आणि नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून देशमुख बोलत होते. पत्रकार भवन येथे सोमवारी आयोजित केलेल्या या कार्यक्रमास राज्य ग्राहक वाद निवारण आयोगाचे अध्यक्ष न्या.आर.सी.चव्हाण, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर, शिधावाटप नियंत्रक डॉ.रत्नदीप गायकवाड, वैधमापन शास्त्र नियंत्रक अशोक डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते.
सध्याच्या मार्केटिंग जगतात ग्राहकांना प्रलोभने देऊन खरेदीसाठी प्रवृत्त करण्याचे प्रमाण वाढत आहे. ग्राहकांची यात होत असलेली फसवणूक रोखण्यासाठी ग्राहक तक्रार निवारण आयोगाला अधिक प्रभावीरित्या काम करण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल असे सांगून अनिल देशमुख पुढे म्हणाले, ग्रामीण भागातील ग्राहकांचे हित संवर्धन करण्याच्या दृष्टीने व्यापक जनजागृतीचे काम करण्यावर भर देणे आवश्यक आहे. यादृष्टीने शासन, ग्राहक, ग्राहकहित संवर्धन क्षेत्रात कार्यरत स्वयंसेवी संस्था या सर्वांनी परस्पर समन्वयातून काम करण्याची गरज आहे. ग्राहकाला उत्तम दर्जाची वस्तू मिळणे हा ग्राहकाचा हक्क असून त्याच्या हक्काचे संरक्षण व्हावे म्हणून केंद्र शासनाने ग्राहक संरक्षण कायदा अंमलात आणला आहे. शासनाने ग्राहकांना आपली तक्रार तात्काळ करता यावी यासाठी हेल्पलाईनही सुरु केली आहे. जागरुक ग्राहक हाच खरा मार्केटिंगचा राजा होऊ शकतो. जागरुक ग्राहक एखाद्या उत्पादन कंपनीवर सुद्धा दबाव निर्माण करु शकतो. यामुळे उत्तम दर्जाचे उत्पादन होऊन राष्ट्राचे आणि पर्यायाने ग्राहकाचेही हित जपले जाईल. ग्राहकाला जागरुक करण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावेत, असेही देशमुख यावेळी म्हणाले.
जागरुक ग्राहक स्वत:बरोबर देशाचे हित जपू शकतो त्यामुळे ग्राहकाला त्याच्या हक्काची जाणीव करुन देऊन त्याला जागरुक करण्यासाठी सर्व पूरक प्रयत्न करत असतानाच तक्रारींचे निवारण विहित कालमर्यादेत त्वरेने करण्याचे प्रयत्न आयोगामार्फत केले जातील, असे राज्य ग्राहक वाद निवारण आयोगाचे अध्यक्ष आर.सी.चव्हाण यांनी सांगितले. यावेळी ग्राहकाचे सक्षमीकरण- ग्राहक हक्कांचे वैश्विकीकरण या विषयावर कन्झ्युमर्स सोसायटी ऑफ इंडियाचे सचिव डॉ.एम.एस.कामत, सहसचिव दिनेश भंडारे यांनी आपले विचार व्यक्त केले.


No comments:
Post a Comment