महापरिनिर्वाण दिनानिमित्त दोन दिवस 'बेस्ट', ट्रेन ची विशेष सेवा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 December 2013

महापरिनिर्वाण दिनानिमित्त दोन दिवस 'बेस्ट', ट्रेन ची विशेष सेवा

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमी व शिवाजी पार्क येथे येणार्‍या भीमसैनिकांच्या सेवेसाठी बेस्ट उपक्रमा मार्फत विशेष सोय केली आहे. अखंडित वीज पुरवठ्याकरिता खास व्यवस्था, ४0 जादा बसगाड्या, ओळखपत्राशिवाय बसपास, प्रथमोपचार केंद्र व अल्पोपाहाराची सुविधा ५ व ६ डिसेंबर रोजी उपलब्ध असणार आहे. या सुविधांसाठी बेस्टच्या अर्थसंकल्पात १0 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे असे बेस्ट समितीचे अध्यक्ष नाना (संजय) आंबोले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

चैत्यभूमी व शिवाजी पार्क परिसरात पालिकेने परवानगी दिलेल्या विविध संस्थांच्या तंबूना तात्पुरत्या स्वरुपात मीटर जोडणीद्वारे वीज जोडणी देण्यात येणार आहे, मार्गप्रकाश दिवे आणि वीजपुरवठा अखंडित ठेवण्याकरिता ३ जनरेटर्स बसवण्यात येणार आहेत, वीज पुरवठ्याबाबत आपत्कालीन देखभालीकरिता मोक्याच्या ठिकाणी एरियल लिफ्ट्स व वॉकीटॉकीने सुसज्य ३ पथके तैनात करण्यात येणार आहेत. महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या अनुयायांसाठी दादर रेल्वे स्थानक पश्चिम व शिवाजी पार्क येथील मंडपामध्ये  माहिती केंद्र उघडण्यात येणार आहे. या दोन्ही ठिकाणी आगाऊ तिकीट विक्री करिता बसवाहक बस निरीक्षकांची नेमणूक केली जाईल असे आंबोले यांनी सांगितले.  

बेस्ट प्रशासनाद्वारे ५ व ६ डिसेंबरला उपस्थित जनसमुदायाकरिता प्रथोमोपचार केंद्र व वैद्यकीय मदत केंद्र उभारण्यात येणार असून वैद्यकीय तपासणी व आवश्यक ते वैद्यकीय उपचार करण्यात येणार आहेत. नेत्र तपासणी शिबिराच्या माध्यमातून गरजू व्यक्तींची नेत्र तपासणी करून आवश्यक असल्यास मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहे. सालाबाद प्रमाणे अल्पोपहार, चहा, पाणी, सेवा पुरवण्यासाठी मंडप उभारण्यात आला आहे. बेस्ट प्रशासनाकडून पुरवण्यात येणाऱ्या सोयी सुविधांसाठी१० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून पुढील वर्षी हि तरतूद वाढवण्यात येणार असल्याचे आंबोले यांनी सांगितले आहे.


मध्य रेल्वेच्या सहा अनारक्षित ट्रेन
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (६ डिसेंबर) दादर येथील चैत्यभूमीसाठी येणार्‍या अनुयायांसाठी मध्य रेल्वेने सहा अनारक्षित ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सीएसटी-दादर ते सेवाग्राम-अजनी-नागपूरदरम्यान या ट्रेन धावतील.
0१00५ ही ट्रेन सीएसटीहून ६ तारखेला १६.0५ वाजता सुटेल आणि अजनी येथे दुसर्‍या दिवशी ८.१0 वाजता पोहोचेल, तर 0१00७ ही ट्रेन सीएसटीहून त्याच दिवशी १८.४0 वाजता सुटेल आणि सेवाग्राम येथे दुसर्‍या दिवशी १0.३0 वाजता पोहोचेल. ७ डिसेंबर रोजी 0१0११ ही ट्रेन दादर येथून 00.४0 वाजता (मध्यरात्री) सुटून त्याच दिवशी नागपूर येथे १८ वाजता पोहोचेल. 0१0२१ ही ट्रेन याच दिवशी सीएसटीहून १२.३५ वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी ३.३0 वाजता पोहोचेल.

मुख्य सचिवांनी घेतला आढावा
नवनियुक्त मुख्य सचिव जे. एस. सहारिया यांनी आज दुपारी दादर येथील चैत्यभूमीस भेट देऊन या ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त करण्यात येत असलेल्या विविध सोयी-सुविधांच्या कामांची पाहणी केली. दुपारी अडीचच्या सुमारास मुख्य सचिव सहारिया यांनी चैत्यभूमीला भेट दिली. यावेळी भारतरत्न डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. 

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS