28/12/2013 http://jpnnews.webs.com
| मुंबई : हेरिटेजच्या नावाखाली सामान्य माणसाला त्रास देणार्यांनी मुळात हेरिटेजबाबत सविस्तर अभ्यास करावा. हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ठेवण्याचा अधिकार यांना कुणी दिला? असा सवाल आमदार नितीन सरदेसाई यांनी शुक्रवारी पत्रकार संघ येथे आप्पा पेंडसे स्मृती व्याख्यानाच्या वेळी केला. या वेळी हेरिटेज समितीचे प्रमुख व माजी सनदी अधिकारी दिनेश अफजलपूरकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष देवदास मटाले, कार्यवाह प्रमोद तेंडुलकर उपस्थित होते. 'हेरिटेज काय व कसे?' या विषयावर हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या वेळी अफझलपूरकर म्हणाले की, या हेरिटेजबाबत मी सध्या काही बोलू शकत नाही. माझे कायद्याने हात बांधले आहेत. त्यामुळे याबाबत मी विधान करू शकत नाही. या वेळी अफझलपूरकर यांनी हेरिटेज म्हणजे काय याची माहिती दिली. कोणत्या वास्तूचा विकास करता येऊ शकतो व कोणत्या वास्तूचा विकास करता येत नाही याची माहिती दिली. आ. नितीन सरदेसाई या वेळी बोलताना म्हणाले की, मुंबई आता उभी विकसित होऊ शकते, आडवी होण्यासाठी जागाच नाही. त्यामुळे सध्या जो मुंबईतला काही भाग वादग्रस्त करण्याचा डाव रचला आहे तो चुकीचा आहे. अनेक इमारतींमधील शौचालयात पावसाळय़ात लोकांना छत्री घेऊन बसावे लागते इतके लिकेज आहे. सिलिंग फॅन कधीही पडू शकतो, अशी सिलिंगची स्थिती आहे. असे असताना हेरिटेजचे भूत कुणी व का आणले आहे. कुटुंब वाढत असताना या भागातील जनतेने कुठे जायचे ? पार्किंगचा प्रश्न मोठय़ा प्रमाणात उभा आहे. झोपडी बांधणार्याला फुकट घर व टॅक्स भरणार्यांना हेरिटेजचे भूत कशाला दाखवताय? असा सवाल त्यांनी या वेळी केला. हेरिटेजच्या व्याख्येत मी व माझे घर येत नसताना माझ्या घराला हेरिटेज म्हणून का घ्यायचे? असा सवाल येथील नागरिक करत आहेत. |


No comments:
Post a Comment