कोळीवाड्यातील मासे विक्रेत्यांना मूलभूत सुविधा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 December 2013

कोळीवाड्यातील मासे विक्रेत्यांना मूलभूत सुविधा

मुंबई : मुंबईतील गावठाणे व इतर कोळीवाड्यांतील आगरी, कोळी समाज बांधवांना, मासे विक्रेत्यांना तात्काळ वीज, पाणी, शौचालय या मूलभूत सुविधांसह कायमस्वरूपी शेड उभारून देण्याबाबतची मागणी भाजपाच्या नगरसेविका मनीषा चौधरी यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. हा ठराव शुक्रवारी पालिका सभागृहात बहुमताने मंजूर करण्यात आला. 

मात्र या सर्व सुविधा येत्या १0 दिवसांत देण्याची मागणीही मनीषा चौधरी यांनी लावून धरली. आता या ठरावावर पालिका आयुक्त सीताराम कुंटे काय अभिप्राय देतात, याकडे सार्‍यांचे लक्ष लागले असून सकारात्मक अभिप्रायानंतर त्यावर अंमलबजावणी होणार आहे. या संदर्भातील चर्चेत भाजपाचे विनोद शेलार, शिवसेनेच्या शितल म्हात्रे, रमेश कोरगावकर, काँग्रेसचे अनिल पाटणकर आदी नगरसेवकांनी सहभाग घेतला.

मुंबईतील गावठाणे व कोळीवाड्यांमध्ये वास्तव्य करणार्‍या आगरी समाजबांधवांना त्यांच्या मासे विक्री या पारंपरिक व्यवसायासाठी महापालिकेने या ठिकाणी कायमस्वरूपी जागा व परवाने उपलब्ध करून दिले नाहीत, तसेच शेडदेखील उपलब्ध करून दिले नसल्याने मासे विक्रेत्यांना उन्हा-पावसात उघड्यावर आपला व्यवसाय करावा लागत आहे, अशी तक्रार मनीषा चौधरी यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. या मासे विक्रेत्या महिलांना पाणी, वीज, शौचलय आदी सुविधांपासून वंचित राहावे लागते. त्यामुळे या मासे विक्रेत्यांना पालिकेने मूलभूत सुविधांसह कायमस्वरूपी शेड्स व परवानेही १0 दिवसांत द्यावे, अशी मागणी त्यांनी केली होती. याप्रसंगी बोलताना शिवसेनेच्या शितल म्हात्रे यांनी भूमिपुत्र कोळी, आगरी मासे विक्रेत्यांना डोक्यावर शेड्स पाहिजे, असे सांगितले. भाजपाचे विनोद शेलार यांनी प्रशासनाला फैलावर घेत भूमिपुत्रांना सर्व सुविधा व परवाने द्यावेत, अशी मागणी सन २000 पासून करत आहोत मात्र प्रशासन दाद देत नाही, अशी तक्रार केली. शिवसेनेचे रमेश कोरगावकर यांनी या वेळी बोलताना सांगितले की, आश्रय योजनेद्वारे लोकांना घरे दिली जाणार आहेत; पण कोळी, आगरी मासे विक्रेत्यांना अनेक वर्षांपासून शेड्स उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. या वेळी काँग्रेसच अनिल पाटणकर यांनीही मासे विक्रेत्यांना सोयीसुविधा देण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी केली.


No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS