रेल्वे प्रवाशांना तिकिटांच्या रांगां पासून त्रास कमी व्हावा म्हणून रेल्वे प्रशासनाने खाजगी तिकीट खिडक्या (जेटीबिएस) सुरु केल्या. याचा वापर प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात सुरु असतानाच रेल्वेच्या नियमाप्रमाणे तिकिटामागे एक रुपया जास्त घेण्याऐवजी जास्त पैसे उकळले जात असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
घाटकोपर पूर्व येथे पंतनगर तिकीट खिडकी जवळच रंजना एंटरप्रायझेस नावाचे जेटीबिएस दीड वर्षा पूर्वी सुरु करण्यात आले. जेटीबिएसमुळे येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एक रुपया अधिक खर्चावा लागत असला तरी रांगा न लावता तिकीट मिळत असल्याने प्रवाशांचा वेळ वाचू लागला, यामुळे प्रवाशांनी जेटीबिएसला चांगलाच प्रतिसाद दिला. या जेटीबिएस मधून दिवसाला २५० ते ३०० तिकिटे विकली जात आहेत. येथून दिवसाला ८ ते १० रेल्वे पासचे नुतनीकरण तसेच ८ ते १० मेल एक्सप्रेसची तिकिटे सुद्धा दिली जात असल्याने रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवरचा भार कमी झाला आहे.
जेटीबिएसला वाढता प्रतिसाद पाहता या जेटीबिएस चालकाने रेवे पास आणि मेल एक्सप्रेसच्या तिकिटांसाठी रेल्वेच्या नियमाप्रमाणे एका तिकीटामागे एक रुपया घेणे बंधनकारक असताना ५ रुपये घेण्यास सुरुवात केली आहे. यामुळे प्रवाशांची खुले आम लुटमार सुरु असल्याने प्रवाशांमध्ये जेटीबिएस चालकाविरोधात आणि रेल्वे प्रशासना विरोधात तीव्र नाराजी पसरली आहे.
याबाबत जेटीबिएस चालकाला विचारले असता पास आणि मेल एक्सप्रेसची तिकिटे १०० रुपयांपेक्षा जास्त असतात चुकीचे तिकीट दिल्यास ते रद्द होत नाही. यामुळे जर १०० रुपयांपेक्षा जास्त किमतीचे तिकीट घेतले तर त्यासाठी आम्ही जास्त पैसे घेतले तर काय चुकले, आम्ही रेल्वेकडे कमिशन किवा तिकिटामागे जास्त पैसे वाढवून देण्याची मागणी करत आहोत परंतू रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे सांगण्यात आले.
रेल्वेच्या नियमाप्रमाणे कोणत्याही तिकिटामागे एक रुपया जेटीबिएस चालकांनी घ्यावा असे आदेश आहेत. या आदेशामध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. एक रुपया पेक्षा जास्त रुपये कोणीही घेत असल्याची तक्रार आमच्याकडे आलेली नाही. तक्रार आल्यास योग्य ती कारवाही रेल्वे प्रशासनाकडून केली जाईल.
ए.के.सिंग
जनसंपर्क अधिकारी (मध्य रेल्वे)


No comments:
Post a Comment