आठवलेंना मध्य प्रदेशातून राज्यसभेची खासदारकी? - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 December 2013

आठवलेंना मध्य प्रदेशातून राज्यसभेची खासदारकी?

मुंबई - 10/12/2013 -  http://jpnnews.webs.com 
मुंबई : भाजपाला चार राज्यांत मिळालेल्या घवघवीत यशामुळे महाराष्ट्रात महायुतीत सामील झालेले आयपीआयचे नेते रामदास आठवले यांचा राजकीय वनवास संपुष्टात येण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशात भाजपाचे १६५ आमदार निवडून आल्यामुळे भाजपाचा राज्यसभेचा कोटा तीनने वाढणार आहे. त्यातील एका जागेवरून आठवले यांना राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवण्याचे भाजपाने निश्‍चित केल्याचे समजते.

दोनच दिवस आधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या विषयावर चर्चा करण्यासाठी भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याशी अहमदाबाद येथे जाऊन चर्चा केली होती. या चर्चेदरम्यान महाराष्ट्रातील दलितांची मते रालोआला मिळावीत या हेतूने रामदास आठवले यांना राज्यसभेची उमेदवारी देण्याबाबतही चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. मध्य प्रदेशात मिळालेल्या भरघोस यशामुळे आता भाजपाला या राज्यातून ११ ऐवजी १४ खासदार राज्यसभेवर पाठवता येणार आहेत. त्यापैकीच एक जागा रामदास आठवले याना दिली जाण्याची शक्यता आहे. भाजपा-शिवसेना युतीत आरपीआयचा समावेश करून, शिवशक्तीला भीमशक्तीचे पाठबळ देऊन महायुती तयार झाली होती. महायुती बनवताना आठवले यांना राज्यसभेची खासदारकी दिली जाईल, असे आश्‍वासन युतीच्या नेत्यांकडून देण्यात आले होते. मात्र यापूर्वी झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपाने आणि शिवसेनेनेही आपापल्या कोट्यातील जागा स्वत:च लढवल्या होत्या. 

येत्या फेब्रुवारीमध्ये महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणुका होणार आहेत. या वेळीही शिवसेना-भाजपाचा एक-एक खासदार निवडून जाणार आहे. मात्र आठवले यांना जागा कोणी द्यायची, भाजपाने की शिवसेनेने? या तिढय़ात आठवलेंची खासदारकी अडकली होती. सातवी जागा आठवलेंनी लढवावी, असेही बोलले जात होते, मात्र सातवी जागा निवडून आणताना मनसे, अपक्ष आणि अन्य पक्षांतील मतांची जुळवाजुळव करावी लागणार असल्याने आठवले हे सातवी जागा लढवण्यास उत्सुक नाहीत. त्यामुळे आता आठवले यांना मध्य प्रदेशातून राज्यसभेवर पाठवून त्यांना खासदारकी देण्याची चर्चा सुरू झाली आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर जमलेल्या डॉ. आंबेडकरांच्या अनुयायांसमोर बोलताना, आठवले यांना मध्य प्रदेशातून खासदारकी देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्‍वासन दिले होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS