3/12/2013 http://jpnnews.webs.com
मुंबई : मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याऐवजी त्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्कॅनिंगद्वारे स्पष्ट करणारी डिजिटल ऑटोप्सी अत्याधुनिक यंत्रणा पालिका रुग्णालयात उपलब्ध करावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे गट नेते रईस शेख यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे.
एखाद्या व्यक्तीचा अनैसर्गिक मृत्यू झाल्यास अथवा जखमी अवस्थेतील व्यक्तीस रुग्णालयात दाखल केल्यानंतर २४ तासांच्या आत त्याचा मृत्यू झाल्यास मृत्यूचे कारण कळण्याकरिता मृतदेहाचे शवविच्छेदन करणे बंधनकारक आहे. मात्र अपघाती निधन झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना आकस्मिक घडलेल्या घटनेचा प्रचंड धक्का बसल्याने मृताचे नातेवाईक शवविच्छेदन करण्यास तयार होत नाहीत तसेच शवविच्छेदनाची कार्यपद्धती लांबलचक असल्याने नातेवाईकांना मृतदेह ताब्यात मिळण्यास विलंब होतो तसेच त्याचा प्रचंड मन:स्तापही त्याना सहन करावा लागतो. अनेक देशात मृत्यूचे निदान करण्यासाठी डिजिटल ऑटोप्सी या पद्धतीचा वापर यशस्वी ठरल्याचे निदर्शनास आले आहे. या पद्धतीत मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याची गरज नसते तर मृतदेहाचे स्कॅनिंग केल्यावर मृत्यूचे नेमके कारण समजते. त्यामुळे मनपा रुग्णालयात मृत व्यक्तीच्या मृत्यूचे नेमके कारण समजण्यासाठी डिजिटल ऑटोप्सी या पद्धतीचा अवलंब करावा, अशी रईस शेख यांची सूचना आहे.


No comments:
Post a Comment