सेंट जॉर्ज रुग्णालयातील सिस्टर्सना अपमानास्पद वागणूक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 December 2013

सेंट जॉर्ज रुग्णालयातील सिस्टर्सना अपमानास्पद वागणूक

मुंबई 12/12/2013- http://jpnnews.webs.com ( JPN NEWS website ) :
मुंबई : सरकारी आस्थापनेत काम करणार्‍या महिलांना सन्मानाची वागणूक द्या, असा फतवा राज्य शासनातर्फे काढला गेला असला तरी शासनाच्याच सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये काम करणार्‍या सिस्टर्सना अत्यंत अपमानास्पद वागणूक मिळाल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाच्या तिघा लेखा परीक्षकांनी गेल्या आठवड्यात सेंट जॉर्ज रुग्णालयाला भेट दिली. या भेटीत औषधाच्या साठय़ाचे परीक्षण केले. या परीक्षणात त्यांना औषधांच्या हिशेबात अनेक त्रुटी आढळल्या. त्यामुळे खवळलेल्या या परीक्षकांनी हॉस्पिटलमध्ये काम करणार्‍या सर्वच सिस्टर्सना धारेवर धरले. औषधांचे पैसे तुमच्या पगारातून कापून घेतले जातील, अशी धमकी या परीक्षकांनी सिस्टर्सना देऊन त्यांची अर्वाच्य भाषेत कानउघाडणी केली. मागील दहा वर्षांच्या औषधांच्या साठय़ाचे परीक्षण करून त्याचे पैसे तुमच्या भविष्य निर्वाह निधीतून वसूल केले जातील, अशी धमकीही दिली.

हे तिघे परीक्षक आपल्या मर्जीनुसार दुपारी हॉस्पिटलमध्ये येत असत. अत्यंत धीम्या गतीने काम करून ते सिस्टर्सना त्रास देत असल्याचा आरोप अनेकांनी केला. सकाळी ७ वाजता कामावर आलेल्या सिस्टर्सना रात्री १0 वाजेपर्यंत हॉस्पिटलमध्ये थांबावे लागत असे. त्यामुळे येथे काम करणार्‍या सर्वच सिस्टर्समध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. काही सिस्टर्सना या परीक्षकांनी कामावरून काढून टाकण्याच्या धमक्या दिल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी अनेक सिस्टर्सनी हॉस्पिटलच्या युनियनच्या काही पदाधिकार्‍यांकडे तक्रार केली असता त्यांनी याबाबत लेखी तक्रार करण्यास सांगितले.

अखेर हतबल झालेल्या या सिस्टर्सनी रुग्णालयाचे प्रमुख डॉ. भवानी यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर या परीक्षकांचा मस्तवालपणा घातला. या प्रकारामुळे आश्‍चर्यचकित झालेल्या डॉ. भवानी यांनी संचालनालयाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी दूरध्वनीवर संपर्क साधून या उद्दाम परीक्षकांना समज देण्याची विनंती केली. एवढेच नव्हे तर यापुढे परीक्षणासाठी चांगली माणसे पाठवण्याचा सल्लाही दिला. एकीकडे महिलांशी चांगले वागा, त्यांना सन्मानाची वागणूक द्या, असा आदेशवजा सल्ला सरकारने आपल्या अस्थापनेतील सर्वच अधिकार्‍यांना दिला असला तरी काही मुजोर अधिकारी आपली दादागिरी आणि उद्दामपणा महिलांपुढे दाखवण्यात मोठेपण मानतात, हेच या घटनेवरून उघड होते.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS