महायुतीतील वागणुकीमुळे आरपीआय नाराज - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 January 2014

महायुतीतील वागणुकीमुळे आरपीआय नाराज

मुंबई : शिवसेना-भाजपाबरोबर महायुतीत सहभागी झालेल्या रिपब्लिकन पार्टीला वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये किती प्रतिनिधित्व दिले जाणार हे अजूनही स्पष्ट न झाल्यामुळे रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून येत्या मकरसंक्रांतीला होणार्‍या जागावाटपाच्या चर्चेत याचे पडसाद उमटण्याची शक्यता जाणकार वर्तवत आहेत. 


काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर बरीच वर्षे सहकार्याचे राजकारण केल्यानंतर गेल्या लोकसभा निवडणुकीत शिर्डी मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर सत्ताधारी आघाडीशी काडीमोड घेत रिपब्लिकन पार्टीचे नेते रामदास आठवले यांनी साधारण दीड वर्षापूर्वी युतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून रामदास आठवले त्यांच्या पक्षाला महायुतीत पुरेसे प्रतिनिधित्व मिळावे म्हणून प्रय▪करत आहेत. महायुतीच्या व्यासपीठावरून अनेकदा जाहीर भाषणांमधूनही त्यांनी वेळोवेळी या भावना व्यक्त केल्या. लोकसभेच्या किमान तीन आणि राज्यसभेची एक जागा मिळालीच पाहिजे, असा आग्रह आठवले यांनी धरला आहे. सूत्रांच्या म्हणण्याप्रमाणे, गेल्या दीड वर्षापासून शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी जागांच्या बाबतीत रिपब्लिकन पार्टीला झुलवत आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना आरपीआयला एक जागा सोडण्यास तयार आहे. मात्र भाजपा त्यांना एकही जागा सोडण्यास तयार नाही. भाजपाने त्यांना राज्यसभेची जागा देण्याची तयारी दाखवली आहे. मध्य प्रदेश वा राजस्थानमधून ते ही जागा सोडणार आहेत. रिपब्लिकन नेत्यांचा या जागेला विरोध आहे. त्यांना महाराष्ट्रातून राज्यसभेची जागा हवी आहे. भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांची राज्यसभेची मुदत संपत आली आहे. त्यांना पुन्हा महाराष्ट्रातूनच राज्यसभेवर पाठविण्यात येणार आहे. त्यांना मध्य प्रदेश वा राजस्थानमधून राज्यसभेवर पाठवा आणि ही जागा आम्हाला द्या, अशी आरपीआयच्या नेत्यांची मागणी आहे. येत्या ऑगस्टमध्ये होणार्‍या विधान परिषदेच्या निवडणुकीत आरपीआयला जागा देणार की नाही, हे अजून युतीच्या नेत्यांनी स्पष्ट केलेले नाही. काँग्रेस आघाडीसारखे युतीचे नेतेही फक्त झुलविण्याचे काम करत आहेत, अशी आरपीआय नेत्यांची भावना आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला महायुतीत सहभागी करण्यापूर्वी मातोश्री बंगल्यावर झालेल्या चर्चेत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच भाजपा नेते गोपीनाथ मुंडे या दोघांनी खासदार राजू शेट्टी यांच्याशी चर्चा केली. या चर्चेसाठी रामदास आठवले यांना निमंत्रण नव्हते. दूरचित्रवाणीवर बातम्या प्रदर्शित झाल्यानंतर रामदास आठवले यांना घाईघाईत अखेरच्या क्षणाला बोलावण्यात आले. याचाही आरपीआयला राग आहे. येत्या १४ जानेवारीला रंगशारदा सभागृहात महायुतीच्या समन्वय समितीची जागावाटपासाठी बैठक होत आहे. या बैठकीत आरपीआयचे नेते पक्षाची नाराजी व्यक्त करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. भाजपाकडून विनोद तावडे, देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, शिवसेनेतर्फे सुभाष देसाई, गजानन कीर्तिकर, लीलाधर डाके, आरपीआयकडून अविनाश महातेकर, अर्जुन डांगळे व सुमंतराव गायकवाड, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून अँड़ सतीश बोरूळकर व सदाभाऊ खोत या वेळी चर्चा करतील. या चर्चेनंतर आरपीआय कोणती भूमिका घेते याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे.
JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS