असुरक्षित महिला नगरसेविका - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 January 2014

असुरक्षित महिला नगरसेविका

12/1/2014
मुंबई मध्ये महिलांवर सर्वाधिक अत्याचार होतात. बलात्कारामध्येही मुंबईचा पहिला नंबर लागतो. मुंबईमध्ये सामान्य महिला असुरक्षित असल्याचा आता पर्यंत मुंबईकर नागरिकांचा समाज होता. परंतू गेले काही दिवस मुंबई महानगर पालिकेमधील वातावरण पाहिल्यावर पालिकेमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून निवडून गेलेल्या महिला नगरसेविका सुद्धा असुरक्षित असल्याचे मुंबईकरांसमोर आले आहे. 

मुंबई महानगर पालिकेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेणाऱ्या शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची गेले १७ वर्षाहून अधिक काळ सत्ता आहे. शिवाजी महाराजांचे प्रत्तेक उपदेश मानून शिवसेना आपली सत्ता चालवत आहे असे कित्तेक लोकांना वाटत आहे. परंतू शिवाजी महाराजांचे नाव घेणाऱ्या शिवसेनेकडून शिवाजी महाराजांचे उपदेश पाळलेच जात नसल्याचे म्हणावे लागेल. 

त्याला कारणसुद्धा तसेच आहे एका अनधिकृत दुकानावर कारवाही करण्याची मागणी भाजपच्या नागसेविकेनी पालिकेकडे केली होती. या तक्रारीमुळे शिवसेनेच्या एका नेत्याचा अहंकार दुखावला होता. या शिवसेनेच्या नेत्यामुळे शिवसेनेच्या महिला नगरसेविकेला सुद्धा मानसिक त्रास सहन करावा लागला आहे. या नगरसेविकेचा मोबाईल क्रमांक सार्वजनिक शौचालयात लिहिण्याचा घाणेरडा प्रकार उघड झाला आहे. तसेच एका नगरसेविकेबद्दल फेसबुक या सोशल नेट्वर्किंग साईट वर अक्षेपार्य मजकूर टाकण्यात आला होता. 

पालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता असल्याने या महिला नगरसेविकांना त्वरित न्याय मिळेल अशी अपेक्षा होती. या महिला नगरसेविकांच्या तक्रारीची कोणीही दखल घेतलेली नाही. पालिकेच्या सर्वोच्च अश्या सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेते देवेंद्र आंबेरकर आणि नगरसेविका वकारउन्नीसा यांनी हरकतीचा मुद्दा मांडून चर्चा करण्याची मागणी केली असता महापौर आणि सत्ताधाऱ्यांकडून आपल्याच नगरसेविकांवर झालेल्या अन्याया बाबत चर्चा करण्यास टाळाटाळ केली जात आहे. 

यामुळे जानेवारी महिन्यातील पहिल्याच दिवशी सभागृहामध्ये गोधळ झाला, सर्व विरोधी पक्ष एकत्र आले त्याला भाजपच्या नगरसेवकांनीही साथ दिली. महापौर चर्चा करण्यास उत्सुक नसल्याचे पाहून महापौरांसमोरील राजदंड मनसेच्या दिलीप लांडे यांनी पळवला. नंतर हा राजदंड वकारउन्नीसा यांनी पळवला. राजदंड परत करा नाहीतर निलंबित करू असे महापौर सुनील प्रभू सांगत राहिले, परंतू संतप्त नगरसेवकांनी कोणीही लक्ष दिले नाही अखेर महापौर प्रभू यांनी सभागृह तहकूब करत असल्याचे जाहीर केले. 

पुन्हा मागील आठवड्यात सभागृह चालू झाल्यावर विरोधी पक्षातील तसेच भाजपच्या नगरसेवकांनी महिला नगरसेविकांच्या सुरक्षेबाबत चर्चा करण्याची मागणी केली असता महापौरांनी सभागृह नेते यशोधर फणसे यांना निवेदन करण्यास सांगितले फणसे यांनी नवीन एअरपोर्ट टर्मिनसचे उद्घाटन होत आहे. या कार्यक्रमाला प्रधानमंत्री येणार असून महापौर सुनील प्रभू यांना निमंत्रण नसल्याने मुंबईच्या प्रथम नागरिकाचा व त्या अनुषंगाने मुंबईकर नागरिकांचा अवमान असल्याने सभा तहकूब करावी अशी मागणी केली. महापौरांनी दुसऱ्या दिवशीही महिला नगरसेविकांच्या सुरक्षेच्या मुद्यावर चर्चा करण्यास टाळाटाळ करून सभा तहकूब केली. 

महापौरांचा अवमान झाल्याबाबत महापौर सुनील प्रभू यांनी प्रधानमंत्र्यांना पत्र दिल्यावर तसेच सेनेच्या कार्यकर्त्यांनी जीव्हीके कंपनीला जाब विचारल्यावर महापौरांना निमंत्रण दिले गेले. महापौरांनी आपल्या अवमानाचा मुद्दा प्रतिष्ठेचा करून महिला नगरसेविकांच्या सुरक्षेचा मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा वाटत नसल्याचा संदेश सर्वच पक्षाच्या महिला नगरसेविकांना दिला आहे. 

महापौरांनी आपल्या अवमानाचा मुद्दा प्रतिष्टेचा करत सभागृह झटपट तहकूब केल्याने चर्चा करण्यापासून पळ काढला आहे. यावर एका बाजूला महिलांच्या सुरक्षेच्या बाता करायच्या आणि प्रत्यक्षात मात्र असे प्रश्न समोर आल्यावर शेपूट घालायची, मुळातच शिवसेनेला महिलांच्या सुरक्षेचे काहीही पडले नसल्याची टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र आंबेरकर यांनी केली आहे. 

जानेवारी महिन्यातील सभागृह चालवण्यासाठी ठरवण्यात आलेल्या दिवसापैकी दोन दिवस महापौरांनी आपल्याच पक्षाची आणि पक्षातील नेत्यांची अब्रू जाईल म्हणून त्यांना वाचवण्यात वाया घालवले आहेत. यामुळे सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेणारी हीच शिवसेना का ? असा प्रश्न मुंबईकर विचारत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी दुष्मनाच्या घरच्या महिलेला सुद्धा सन्मानाने वागवण्यास सांगितले होते. छत्रपतींची हि शिकवण शिवसेनेचे महापौर सुनील प्रभू विसरलेले दिसत आहेत.  

आज जर बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर झाल्या प्रकाराबद्दल त्यांना कित्तेक यातना झाल्या असत्या. बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या स्वभावाप्रमाणे इतर पक्षातील लोकांप्रमाणेच आपल्या पक्षातील कोणी चुकीचे काम केल्यास त्यांचीही खरडपट्टी काढली आहे. महापौर सुद्धा या खाराद्पती मधून सुटले नसते. आज बाळासाहेब नसल्याने आपल्याला कोणी काही करू शकत नाही अशी समज झाली असल्याने महिला नगरसेविकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जात आहे. 

एका शिवसेनेच्या नेत्याकडून आपल्याच पक्षाच्या व सत्तेमध्ये सहभागी असलेल्या भाजपच्या नागसेविकेला त्रास देण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकारानंतर दोन दिवस सभागृह तहकूब करावे लागले आहे याची शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दखल घेण्याची गरज आहे. महिला नगरसेविकांबरोबरच मुंबईकरांना सोयी सुविधा पुरविण्याबाबत कित्तेक विषय आहेत ज्यावर सभागृहामध्ये चर्चा होणे गरजेचे आहे. अन्यथा सत्ताधारी मुंबईकर आणि महिलांच्या समस्यांकडे नेहमी दुर्लक्ष करतात असा संदेश मुंबईकर नागरिकांमध्ये जाईल. 

अजेयकुमार जाधव 
मो. ९९६९१९१३६३

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS