11/1/2014
मुंबई - राज्य सरकारने जादूटोणा विरोधी कायदा पास करून स्वत:ची पाठ थोपटून जरी घेतली असली तरी लोहमार्ग पोलिसांनी मुंबईच्या उपनगरी लोकलमध्ये फुकटात ‘पोस्टरबाजी’ करून धंदा थाटणार्या एकाही बंगाली बाबावर या नव्या कायद्याखाली कारवाई केलेली नसल्याचे उघड झाले आहे. २४ तासांत सर्व समस्यांतून सुटका करण्याचे ‘खुले चॅलेंज’ देणार्या बाबांच्या विरोधातील कारवाईचा चेंडू ‘आरपीएफ’ व ‘जीआरपी’ अशा रेल्वेच्या दोन्ही तपासयंत्रणंनी एकमेकांच्या कोर्टात टाकल्याने बंगाली बाबांचे चांगलेच फावले आहे.
सरकारने भोळीभाबडी जनता बंगाली, भोंदू बाबांच्या आमिषाला भुलू नये, नाडली जाऊ नये म्हणून नुकतेच जादूटोणाविरोधी विधेयक संमत केले. ‘प्रेमप्रकरण, सौतन, फिल्म करियर, कर्जप्रकरण, मूठकरणी, खाण्यापिण्यातून काही दिले असल्यास २४ तासांत आराम मिळेल, सर्व समस्यांचे निराकरण होईल, असे ‘खुले चॅलेंज’ देणारी भोंदूबाबांची पोस्टर्स लोकल ट्रेनमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून चिकटवली जात आहेत. त्याच्यावर भोंदूबाबांचे मोबाईल क्रमांक बिनधास्त छापून प्रचार केला जात असूनही बाबांच्या केसालाही पोलीस धक्का लावू शकलेले नाहीत.
केवळ १ महिना जेलरेल्वेच्या मालमत्तेच्या रक्षणाची जबाबदारी रेल्वे सुरक्षा बल म्हणजेच ‘आरपीएफ’कडे असल्याने त्यांच्या तक्रारींची वाट लोहमार्ग पोलीस (जीआरपी) पाहत बसतात आणि ‘आरपीएफ’ रेल्वे कायदा कलम १६६ नुसार बंगाली बाबांच्या पोस्टरवर कारवाई करते. परंतु रेल्वे कायद्यात यासाठी १ महिना शिक्षा किंवा ५०० रुपये दंड अथवा दोन्ही अशा किरकोळ शिक्षेची तरतूद असल्याचे सूत्रांनी सांगितले. अशा प्रकरणात मोबाईल कंपन्या प्रायव्हसीच्या कायद्याखाली पोस्टरवरील दूरध्वनी क्रमांकांचा पाठपुरावा करण्यास योग्य सहकार्य करीत नाहीत. नव्या जादूटोणा विरोधी कायद्यानुसार जीआरपीने गुन्हा दाखल केला तर सात वर्षांची शिक्षा होऊ शकते.
- अलोक बोहरा, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त रेल्वे
रेल्वे कायद्यानुसार २०१३ मधील कारवाईरेल्वेच्या कायदा कलम १६६ नुसार पोस्टरबाजी करण्याचे ४८८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी ३,४५,३१० रुपयांचा दंड आकारण्यात आला असून फक्त दोन लोकांना कारावासाची शिक्षा झाली आहे.


No comments:
Post a Comment