देशाच्या विकासासाठी सामाजिक समानता असणे आवश्यक -राज्यपाल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 January 2014

देशाच्या विकासासाठी सामाजिक समानता असणे आवश्यक -राज्यपाल




'महान्यूज' शनिवार, ११ जानेवारी, २०१४
मुंबई : सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात कार्य केलेल्या महान व्यक्तींच्या विचारावर आधारित समानता समाजात असणे आवश्यक आहे असे प्रतिपादन राज्यपाल के. शंकरनारायणन्‌ यांनी आज येथे केले.

अमेरिकेतील पेरियार इंटरनॅशनल संस्थेच्या वतीने सामाजिक न्याय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी के. विरमणी पुरस्कार देण्यात येतो. 2013 चा पुरस्कार राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना महाराष्ट्राचे राज्यपाल के. शंकरनारायणन्‌ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. रविंद्र नाट्य मंदिरात झालेल्या दिमाखदार सोहळ्यात भुजबळ यांचा शाल, सन्मानपत्र आणि रोख एक लाख रुपये देऊन गौरव करण्यात आला यावेळी द्रविड कझघम चे अध्यक्ष डॉ. के. विरमणी, खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ, पेरियार इंटरनॅशनल संस्थेचे संचालक डॉ.एस. इलन गोवन, डॉ. कैलास कमोद आदी मान्यवर उपस्थित होते. 

आजच्या युगात प्रत्येक गोष्ट बाजारात विकत मिळते परंतु, सामाजिक न्याय हे कार्य असे आहे की जे कोठेही विकत घेता येत नाही याची जाणिव प्रत्येकाच्या हृदयात असली पाहिजे. मनुष्य हा त्याच्या संपत्तीमुळे नाही तर त्याच्या कार्यकतृत्वामुळे मोठा होतो असे सांगुन राज्यपाल पुढे म्हणाले की, पे‍रियार स्वामी यांनी समाजातील तळागाळातील लोकांसाठी काम केले तसेच जातीयवाद निर्मूलनासाठी त्यांनी सतत पुढाकार घेतला. प्रत्येक व्यक्तीं ही त्यांच्या संपत्तीने मोठी ठरत नाही तर त्या व्यक्तीने केलेल्या कार्यामुळे मोठी ठरते असे सांगुन त्यांनी महात्मा फुले, छत्रपती शाहु महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. पेरीयार यांनी केलेल्या सामाजिक कार्याची आठवण करुन दिली. आपला देश विकसित आहे परंतु आपल्याला अजुनही प्रगतीचा मोठा पल्ला गाठायचा आहे. त्यासाठी समाजाच्या सर्व क्षेत्रात समानता व सामाजिक न्याय असणे आवश्यक आहे. आजच्या पुरस्कारासाठी भुजबळ यांची निवड सार्थ असून त्यांनी सामाजिक न्याय क्षेत्रात केलेले कार्य उल्लेखनिय आहे. भुजबळ यांची उत्तम प्रशासक म्हणूनओळख आहे असे गौरवोद्‌गार काढून ते म्हणाले देशात झालेल्या महान व्यक्त्तींच्या कार्यातून आणि विचारातून प्रेरणा घेऊन आपण सामाजिक न्यायाचे उद्दिष्ट गाठले तर आपल्याला अपेक्षित असलेल्या देशाचा विकास सहज करता येईल.

पुरस्कार स्विकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना भुजबळ म्हणाले की, मी हा पुरस्कार देशातील कष्टकरी, दलित बांधव, इतर मागासवर्गीय बांधव, अल्पसंख्याक बांधव, महिला भगिनींना अर्पण करतो.हा पुरस्कार महात्मा फुले, छत्रपती शाहु महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पेरियार रामस्वामी यांनी आखून दिलेल्या सामाजिक कार्याच्या मार्गावर वाटचाल करण्यासाठी ऊर्जा देणारा ठरला आहे. सामाजिक कार्य करीत असताना समाजातून अवहेलना सहन करावी लागते. हा प्रवास सुखकर नाही, मात्र मनाला आनंद देणारा आहे, असे सांगुन भुजबळ म्हणाले की, मानव जात एकच आहे, सर्वांचे हक्क अधिकार समान आहेत पण अजुनही जातींच्या उतरंडीला आपण हद्दपार करु शकलो नाही. जातीयवादाचे हे दिवस जेव्हा संपतील तेव्हा सर्वांना अभिप्रेत असलेला सामाजिक न्याय अस्तित्वात येईल. यावेळी पुस्कारासाठी मिळालेली रक्कम त्यांनी पेरियार संस्थेच्या सामाजिक कार्यायाठी दिली.

डॉ. के. विरमणी म्हणाले की, महाराष्ट्रात महात्मा फुले आणि तामिळनाडू मध्ये पेरियार स्वामी यांनी सामाजिक न्यायासाठी केलेले कार्य म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे या दोन्ही राज्यांमध्ये वैचारिक आणि सांस्कृतिक साम्य आहे असे गौरवोद्‌गारही त्यांनी काढले. पेरियार संस्थेचे संस्थापक डॉ. एस. इलनगोवन यांनी प्रास्ताविक केले.

याप्रसंगी राज्यपालांच्या हस्ते पेरियार स्वामी यांच्या जीवनचरित्राचा मराठी अनुवाद असलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. भुजबळ यांना राज्यापालांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करीत असताना सभागृहातील उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात मानवंदना दिली. या सभागृहात भुजबळ यांचे कुटंबीय, समता परिषदेचे कार्यकर्ते, नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते.डॉ. पी. अनबलगन यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS