राज्यसभेची निवडणूक बिनविरोध - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 January 2014

राज्यसभेची निवडणूक बिनविरोध

मुंबई : राज्यसभेच्या सात जागांसाठी ७ फेब्रुवारीला होणार्‍या निवडणुकीसाठी आठवा उमेदवार देण्यात कोणत्याही राजकीय पक्षाने स्वारस्य न दाखविल्यामुळे सातच अर्ज आल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार हे स्पष्ट झाले आहे. याबाबतची औपचारिक घोषणा अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर म्हणजे शुक्रवारी ३१ जानेवारीला केली जाणार आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी महायुतीकडून रिपाइं नेते रामदास आठवले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार व माजीद मेमन, काँग्रेसचे मुरली देवरा व हुसेन दलवाई, शिवसेनेचे राजकुमार धूत व रामदास आठवले यांच्यासह पुण्याचे बांधकाम व्यावसायिक संजय काकडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

राज्य विधानसभेतून राज्यसभेवर पाठविण्यात येणार्‍या सात जागांसाठी ७ फेब्रुवारी रोजी निवडणूक होत आहे. या जागांवरील सध्याचे भारतकुमार राऊत व राजकुमार धूत (दोन्ही शिवसेना), हुसेन दलवाई व मुरली देवरा (दोघेही काँग्रेस), वाय. पी. त्रिवेदी आणि जनार्दन वाघमारे (दोन्ही राष्ट्रवादी) व प्रकाश जावडेकर (भारतीय जनता पार्टी) यांची मुदत येत्या एप्रिलला संपत आहे. या निवडणुकीकरिता उमेदवारांनी अर्ज भरण्याची मुदत मंगळवारी समाप्त झाली. सात जागांसाठी सातच अर्ज आल्यामुळे निवडणूक टळली आहे. छाननी व अर्ज मागे घेण्याची मुदत शुक्रवारी ३१ जानेवारीला संपल्यानंतर याबाबतची औपचारिक घोषणा होणार आहे. 

विधानसभेतील संख्याबळानुसार राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे प्रत्येकी दोन व शिवसेना-भाजपाचे प्रत्येकी एक उमेदवार सहज विजयी होणार, हे स्पष्ट होते. मात्र सातव्या जागेसाठी चुरस होती. सात जागांसाठी राजकुमार धूत (शिवसेना), शरद पवार व अँड़ माजीद मेमन (दोघेही राष्ट्रवादी), रामदास आठवले (रिपाइं), हुसेन दलवाई व मुरली देवरा (दोघेही काँग्रेस) आणि संजय काकडे (अपक्ष) यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. आठवा म्हणजेच अतिरिक्त मतांवर निवडून येण्यासाठी कोणी उमेदवार न दिल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. अतिरिक्त मते असतानाही आघाडी व महायुतीकडून सातवा उमेदवार रिंगणात उतरविला गेला नाही. परिणामी अपक्ष उमेदवार पुण्याचे बांधकाम व्यावसायिक संजय काकडे यांचे राज्यसभेवर जाण्याचे स्वप्न साकार झाले आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS