15/1/2014
| मुंबई : रुग्णावर उपचार करण्यात हलगर्जीपणा केल्याच्या आरोपाखाली सोमवारी रात्री महानगरपालिकेच्या राजावाडी रुग्णालयातील एका डॉक्टरला केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ तेथील डॉक्टरांनी काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले. डॉ. गौरव हळदणकर असे मारहाण करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव असून अन्य डॉक्टरांनी बारा तासांचा बंद पाळला होता. सकाळपासूनच डॉक्टरांनी काळ्या फिती लावून या घटनेचा निषेध नोंदवला. बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत येथील डॉक्टर संपावर असतील, अशी माहिती रुग्णालयाचे उपप्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल चापे यांनी दिली. रुग्णालयाच्या आवारात सीसीटीव्ही बसवणे, पोलीस चौकी उभारणे आदींसह विविध मागण्या डॉक्टरांनी लावून धरल्या आहेत. रुग्णालयात सलीम नावाचा एक रुग्ण गंभीर जखमी अवस्थेत आला. त्या वेळी डॉ. गौरव हे एका रुग्णावर उपचार करत होते. सलीमच्या जखमेतून रक्तस्राव होत असल्याचे पाहून त्यांनी प्राथमिक उपचार करून सलीमला बसायला सांगितले. मात्र रागावलेल्या सलीमने डॉ. गौरव यांना मारहाण केली. या घटनेच्या निषेधार्थ डॉक्टरांनी अचानक काम बंद आंदोलन पुकारल्यामुळे रुग्णांचे अतोनात हाल झाले. सोलापूर येथे एका निवासी डॉक्टरला मारहाण केल्याच्या निषेधार्थ राज्यभरात निवासी डॉक्टरांनी संप पुकारला. या पार्श्वभूमीवर डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. आपल्या विविध मागण्यांमध्ये डॉक्टर नेहमीच सुरक्षिततेचा मुद्दा प्रकर्षाने मांडतात; परंतु डॉक्टरांची या मागणीवर अद्यापि ठोस निर्णय घेण्यात येत नसल्यामुळे राज्यभरातील डॉक्टरांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सोमवारी रात्रीही अशाच प्रकारे रुग्णावर उपचार करण्यात हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत रुग्णाचे नातेवाईक आक्रमक झाले आणि डॉक्टरांनाच मारहाण केली. याचा निषेध म्हणून दुसर्या दिवशी राजावाडी रुग्णालयातील डॉक्टरांनी काम बंद आंदोलन केले. दरम्यान या घटनेची तक्रार टिळक नगर पोलिसांत देण्यात आली असून सलीमला ताब्यात घेतले आहे. |


No comments:
Post a Comment