मुंबई गारठली! - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 January 2014

मुंबई गारठली!

7/1/2014  http://jpnnews.webs.com
मुंबई : मागील काही दिवस पार्‍याने अचानक उसळी घेतल्यामुळे शहरातून थंडी पळाली की काय अशी शंका उपस्थित होत असतानाच सोमवारी थंडीने मुंबईकरांना अक्षरश: हुडहुडी भरवली. पहाटेच्या सुमारास कुलाब्यात १७, तर सांताक्रुझमध्ये १४.४ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. सांताक्रुझमधील तापमान चालू हंगामातील सर्वात कमी तापमान असल्याची माहिती कुलाबा वेधशाळेतील वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली.

डिसेंबरअखेरीस उत्तर भारतातील कडाक्याच्या थंडीचा परिणाम मुंबईच्या वातावरणावर दिसून आला होता. त्या थंडीने काही दिवसच मुक्काम ठोकला होता. नववर्षाच्या सुरुवातीला थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता होती; पण थर्टी फस्र्टच्या रात्रीच थंडीने धूम ठोकल्याने मुंबईकर उकाड्याने त्रस्त झाले होते. सोमवारी किमान तापमानात अचानक मोठी घसरण झाल्यामुळे मुंबईकरांना हुडहुडी भरली. 

सांताक्रुझमध्ये सरासरीपेक्षा ३ अंशांनी कमी म्हणजेच १४.४ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. हे तापमान नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीतील सर्वात कमी तापमान असल्याची माहिती कुलाबा वेधशाळेतील वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली. यापूर्वीचे सर्वात कमी तापमान २२ डिसेंबर रोजी १४.८ अंश सेल्सिअस इतके नोंद झाले होते. तत्पूर्वी १६ डिसेंबरला १५.६ अंश सेल्सिअस तापमान होते. हे सर्व विक्रम मोडीत काढत सोमवारी किमान तापमानाची पातळी १४.४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आली.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS