महिला संरक्षणाबाबत ठराव मांडण्याची मनसेची मागणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 January 2014

महिला संरक्षणाबाबत ठराव मांडण्याची मनसेची मागणी

18/1/2014
मुंबई : शिवसेना नगरसेविका शितल म्हात्रे यांचा स्थानिक आमदाराकडून होत असलेल्या छळवणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शुक्रवारी मनसेच्या नगरसेविकांनी महापौर सुनील प्रभू यांच्या दालनात त्यांची भेट घेऊन महिला नगरसेविकांना संरक्षण देण्याचा ठराव पालिका सभागृहात मांडण्याच्या प्रस्तावाला परवानगी द्यावी, अशी मागणी केली.

शितल म्हात्रे. डॉ. शुभा राऊळ या शिवसेना नगरसेविकांसह भाजपाच्या नगरसेविका मनीषा चौधरी यांचा स्थानिक आमदार विनोद घोसाळकर यांच्याकडून सुरू असलेल्या छळाचे संपूर्ण मुंबईत तीव्र पडसाद उमटले आहेत. हे प्रकरण दिवसेंदिवस अधिकच चिघळले असून महिलांनी राजकीय क्षेत्रात काम करायचे तरी कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याची पालिका वतरुळात जोरदार चर्चा सुरू असून विरोधी पक्षनेते नगरसेवक या नगरसेविकांवर होत असलेल्या अन्यायामुळे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. याच पार्श्‍वभूमीवर मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या नगरसेविकांनी शुक्रवारी महापौरांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. 


महिला आरक्षण देऊन विविध क्षेत्रांत महिलांना त्यांचे कर्तृत्व दाखवण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे आणि महिलांनी ते सिद्ध केले आहे. दुसरीकडे काही समाजकंटक किंवा विकृत प्रकृतीची माणसे सुशिक्षित व सुसंस्कृत महिलांचे विविध मार्गाने प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरीत्या मानसिक खच्चीकरण करण्याचे प्रयत्न करत आहेत. महिला लोकप्रतिनिधी त्यांच्या प्रभागातील महिलांना संरक्षण देण्याची हमी देत असताना आज या सभागृहातील सर्व महिला लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेबाबत शंका निर्माण झाली आहे. हे सभागृह सर्व महिला नगरसेविकांच्या सुरक्षेसाठी व सन्मानासाठी कटिबद्ध आहे, असा ठराव मांडण्याची आम्हाला परवानगी द्यावी, अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS