9/1/2014
मुंबई : मिठी नदीचा गाळ साफ करण्याचे काम पालिके कडे सोपवण्याच्या एमएमआरडीएच्या भूमिकेबाबत स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याने अखेर यासंदर्भातील प्रस्ताव राखून ठेवण्यात आला. मिठी नदीच्या साफसफाईचा प्रस्ताव बुधवारी प्रशासनासमोर स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी आणला. मात्र मिठी नदीच्या परिसरातील भूखंड विकून मिठी नदीचा गाळ साफ करण्याचे काम पालिकेच्या माथी मारण्याच्या एमएमआरडीएच्या भूमिकेबाबत भाजपाचे गटनेते दिलीप पटेल यांनी तीव्र विरोध केला. मिठी नदीचा गाळ काढण्यासाठी पालिकेने १0 कोटी रुपये का खर्च करावे, असा सवाल करत हा प्रस्ताव राखून ठेवण्याची मागणी पटेल यांनी केली. याला अन्य सदस्यांनीही पाठिंबा दिला. अखेर एमएमआरडीएच्या मनमानीपणाची गांभीर्याने दखल घेत हा प्रस्ताव स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी राखून ठेवला. दरम्यान, एमएमआरडीएच्या हद्दीतील वांद्रे-कुर्ला संकुल परिसराची यांत्रिकी झाडूने साफसफाई करण्याच्या प्रस्तावालाही सदस्यांची विरोध केल्याने हा प्रस्तावही राखून ठेवण्यात आला.


No comments:
Post a Comment