मुंबईत शिवसेनेच्या महिला नगरसेविकांची मुस्कटदाबी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 January 2014

मुंबईत शिवसेनेच्या महिला नगरसेविकांची मुस्कटदाबी

14/1/2014
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर पक्षातील अंतर्गत कलह दिवसेंदिवस अधिकच वाढत असल्याचे दिसत आहे. ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी पक्षनेतृत्वावर नाराजी व्यक्त करत केलेले बंड शिवसैनिकांच्या स्मरणात असतानाच आता मुंबईतील महिला नगरसेविकांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. माजी महापौर आणि नगरसेविका शुभा राऊळ यांनी 'फेसबुक'वर आपल्या कामात आमदार आडकाठी करत असल्याचा आरोप करत मदतीसाठी 'श्रीकृष्ण' अर्थात पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना आर्त साद घातली आहे.

शिवसेनेचे आमदार विनोद घोसाळकर हे शिवसेनेच्या नगरसेविकांच्या कामांमध्ये अडथळा आणत असल्याचा आरोप गेल्या काही दिवसांपासून होत आहे. एका बड्या बिल्डरविरोधात शुभा राऊळ आणि शीतल म्हात्रे या शिवसेना नगरसेविका मैदानात उतरल्या होत्या. त्याच्यावर कठोर कारवाईसाठी प्रयत्न करत होत्या. परंतु त्यांना सर्मथन देण्याऐवजी आमदार घोसाळकर बिल्डरच्या बाजूने उभे राहिले आणि इथेच शुभा राऊळ यांच्यात नाराजी पसरली. शिवसेना-भाजपा युतीच्या चार नगरसेविकांनी या प्रकरणी वारंवार पक्षनेतृत्वाकडे साकडेदेखील घातले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा मुद्दा गांभीर्याने घेत नगरसेविकांचे म्हणणे ऐकण्यासाठी 'मातोश्री'वर बोलावले होते. परंतु मागील १0 दिवसांपासून त्यांनी ही भेट तब्बल तीन वेळा नाकारली आहे. 

त्यामुळे युतीच्या नगरसेविकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात असतानाच माजी महौपार आणि नगरसेविका शुभा राऊळ यांनी थेट सोशल मीडियाचा वापर करत आपल्या व्यथा मांडल्या. 'सावित्रीच्या लेकीचा लढा चालूच आहे, २१ व्या शतकातही.. या आंतरराष्ट्रीय नगरीत, या लेकी स्थानिक स्वराज्य संस्थेने दिलेल्या ५0 टक्के आरक्षणानुसार निवडून आल्या. स्वत:ला सिद्ध करताना येणारे अडथळे ओलांडत, स्वाभिमानाला सांभाळत, जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सुरू असलेल्या लढय़ात या द्रौपदीचे मानहानीरुपी वस्त्रहरण सुरू आहे. या धृतराष्ट्रांच्या नगरीत द्रौपदीच्या हाकेला धावून येणारा कृष्ण कोणी होईल का?' असा प्रश्न त्यांनी फेसबुकवर उपस्थित केला आणि शिवसेनेच्या वतरुळासह राजकीय वातावरणही ढवळून निघाले. 

शुभा राऊळ यांनी आपल्यासारख्या युतीच्या नगरसेविकांना द्रौपदी, तर आमदार घोसाळकर यांचा अप्रत्यक्षपणे 'धृतराष्ट्र' म्हणून उल्लेख केला आहे. तर मदतीसाठी 'कृष्ण' अर्थात उद्धव ठाकरे यांना साकडे घातले आहे. राऊळ यांच्या फेसबुकवरील स्टेटसमुळे सेनेच्या नेतृत्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे. एरवी कैफियत मांडण्यासाठी शिवसेनेतील पदाधिकारी थेट मातोश्रीवर जात असत, परंतु त्यासाठी आता त्यांना सोशल मीडियाचा वापर करावा लागल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मनोहर जोशींचे बंड शांत झाले असतानाच आता ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सेनेच्या रणरागिणींचे हे रूप पाहून सर्वच अवाक झाले आहेत. सकाळपासून ही चर्चा सुरू होताच दुपारी उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर पत्रकार परिषद बोलावली होती. त्यामध्ये ते या विषयावर स्पष्टीकरण देतील अशी अपेक्षा होती. परंतु हा मुद्दा पक्षांतर्गत असल्याचे सांगत त्यांनी यावर बोलण्याचे टाळले.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS