15/1/2014 - मुंबई / अजेयकुमार जाधव - दलित पॅंथर चळवळीचे प्रणेते, जेष्ठ साहित्यिक व विचारवंत पद्मश्री नामदेव ढसाळ यांचे आज पहाटे चार वाजता मुंबईत निधन झाले. ते 64 वर्षाचे होते. आतड्याच्या कर्करोगामुळे मागील काही वर्षापासून ते आजारी होते. दोन महिन्यापासून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळली. उद्या ( १६ जानेवारी ) सकाळी १० वाजता वडाळ्यातील आंबेडकर कॉलेज परिसरातील सिद्धार्थ वसतीगृह येथे ढसाळ यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार त्याच ठिकाणी त्यानंतर दुपारी १ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
ढसाळ हे निव्वळ साहित्यिक कधीच नव्हते, नाहीत. सत्तरीच्या दशकात जोरदारपणे पुढे आलेल्या दलित चळवळीतील ‘दलित पँथर' या युवक संघटनेचे ते प्रमुख नेते होते. याच काळात उदयाला आलेल्या अनियतकालिकांच्या चळवळीतही ते अग्रस्थानी होते. ढसाळांच्या ‘'गोलपिठा' या पहिल्याच कवितासंग्रहाने मराठी सारस्वतांना उपेक्षितांच्या जगाचं, जाणिवांचं, तीव्र संतापाचं आणि त्यामधून आलेल्या बेधडक अभिव्यक्तीचं जालीम दर्शन घडवलं. "गोलपिठा' ही मराठी साहित्यातील अजोड व अभिजात निर्मिती ठरली.
त्यानंतर तुही इयत्ता कंची, या सत्तेत जीव रमत नाही, गांडू बगीचा, मूर्ख म्हातार्याने डोंगर हलवले, आमच्या इतिहासातील एक अपरिहार्य पात्र : प्रियदर्शनी, खेळ, मी मारले सूर्याच्या रथाचे सात घोडे, तुझे बोट धरून चाललो आहे मी हे कवितासंग्रह; हाडकी हाडवळा, निगेटिव्ह स्पेस या कादंबर्या, आंधळे शतक, आंबेडकरी चळवळ आणि सोशालिस्ट कम्युनिस्ट, तसंच बुद्धधर्म आणि शेष प्रश्न हे चिंतनपर लेखन नामदेव ढसाळांनी केलं. त्यांच्या या साहित्यिक कामगिरीचा गौरव भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री' सन्मान देऊन केला.
नामदेव ढसाळांच्या बिनधास्त अभिव्यक्तीला श्रेष्ठ वैश्विक वाङ्मयीन जाण होती. त्यांचं जीवन आणि साहित्य हे नेहमीच मराठी जगतात आदर, कुतूहल, वाद आणि चर्चेचा विषय राहिलं आहे. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय राजकारण-समाजकारण, समीक्षा, दलित चळवळीतील कंगोरे, कविता, कादंबरी असं बरंच काही ढसाळ गेली चाळीसहून अधिक वर्षं सातत्याने लिहीत होते.
नामदेव लक्ष्मण ढसाळ यांचा परिचय
नामदेव लक्ष्मण ढसाळ यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९४९ मध्ये पुणे जिल्ह्यात झाला. मराठी दलित साहित्यातील परिवर्तन घडवणारे लेखक आणि दलित चळवळीतील नेते आहेत. महानगरीय जीवन आणि बोली भाषा या विषयावरील मराठीतले महत्त्वाचे लेखन त्यांनी केले आहे.
ढसाळ दलितांचे,शोषितांचे जीवन स्वतः भोगलेले , अनुभवलेले असे सिद्धहस्त लेखक, कवी, कादंबरीकार, नाटककार आहेत. नामदेव ढसाळांचे बालपण मुंबईतील झोपडपट्ट्यांमध् ये अत्यंत गरीबीत गेले. त्यांचे वडील खाटीक होते. त्यांनी स्वतः मुंबईमध्ये अनेक वर्षे टॅक्सी चालवली. अमेरिकन ब्लॅक पँथर चळवळीच्या धरतीवर त्यांनी दलित पँथर ही सशस्त्र संघटना १९७२ मध्ये सुरू केली.
१९७३ मध्ये त्यांचा पहिला कवितासंग्रह गोलपीठा प्रकाशित झाला. यानंतर आणखी कवितासंग्रह मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले (माओईस्ट विचारांवर आधारित), तुझी इयत्ता कंची?, खेळ (शृंगारिक), आणि प्रियदर्शीनी (इंदिरा गांधी यांच्या विषयीचा) प्रसिद्ध झाले.
मराठी कवितेतील एक प्रतिभाशाली कवी. आपल्या विशिष्ट शैलीने मराठी कवितेच्या परंपरेत मोलाची भर घालणाऱ्या आणि भाषिक दृष्टया प्रमाण मराठी भाषेपेक्षा वेगळी भाषा वापरून मराठीला समृद्ध करणाऱ्या मोजक्या साहित्यिकांपैकी ढसाळ हे एक आहेत.
ढसाळ यांचे प्रसिध्द झालेले साहित्य
कविता संग्रह
- गोलपीठा (१९७२)
- खेळ (१९८३)
- मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले (१९७५)
- तुही यत्ता कंची (१९८१)
- या सत्तेत जीव रमत नाही (१९९५)
- मी मारले सूर्याच्या रथाचे घोडे सात
- तुझे बोट धरुन चाललो आहे
- आमच्या इतिहासातील एक अपरिहार्य पात्र : प्रियदर्शिनी (१९७६)
- गांडू बगीचा (१९८६)
नाटक
- अंधार यात्रा
कादंबरी
- हाडकी हाडवळा
- निगेटिव स्पेस्
पुरस्कार
- बुद्ध रोहिदास विचार गौरव - इ.स. २००९
- साहित्य जीवन गौरव पुरस्कार २००४
- पद्मश्री पुरस्कार


No comments:
Post a Comment