लोककलेच्या संवर्धन व संरक्षणासाठी शिक्षण महत्वाचा घटक - आशुतोष घोरपडे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 February 2014

लोककलेच्या संवर्धन व संरक्षणासाठी शिक्षण महत्वाचा घटक - आशुतोष घोरपडे

तमाशा या लोककलेला उज्ज्वल परंपरा लाभली असून, या कलाप्रकाराला वेगळी अशी ओळख न मिळाल्याने समाजात या कलाप्रकाराविषयी चुकीचा दृष्टिकोन आहे. या लोककलेच्या संवर्धन व संरक्षणासाठी शिक्षण हा घटक महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. तमाशा लोककलेच्या संवर्धनासाठी शासनाबरोबरच जनतेची साथ मिळण्याची आवश्‍यकता आहे, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक आशुतोष घोरपडे यांनी केले.

 लोककवी वामनदादा कर्डक अध्यासन, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक आणि शाहीर अमरशेख अध्यासन लोककला अकादमी, मुंबई विद्यापीठ यांच्या सहकार्याने आज मुक्त विद्यापीठात तमाशा प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले. विद्यापीठाच्या शैक्षणिक सभागृहात सुरु झालेल्या या शिबिराचे उदघाटन विद्यापीठाचे वित्त अधिकारी पंडित गवळी यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून घोरपडे बोलत होते.  

 या वेळी बोलताना आशुतोष घोरपडे आपल्या भाषणात म्हणाले की, तमाशा रांगडी लोककला असून या कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन सशक्त होण्यास तमाशा प्रशिक्षण शिबिरांमुळे मदत होईल असा विश्वास व्यक्त करून घोरपडे म्हणाले की, तमाशा गावगाड्या मधील वेशीबाहेरची प्रयोगसिध्द कला आहे. शेतकरी, मजूर व खेड्यापाड्यांमध्ये राहणाऱ्या जनतेचे तमाशाच्या माध्यमातून मनोरंजना बरोबरच प्रबोधनही होते. या कलेला टिकवून ठेवायचे असल्यास संबंधित कलावंतांचा योग्य सन्मान झाला पाहिजे असे ते म्हणाले. तमाशा या लोककलेच्या वाट्याला आलेली विवंचना माध्यमांनी पाहिलेली असून या लोककलेचा सम्यक भाव पकडण्याची आवश्‍यकता आहे असे सांगतानाच तमाशा या लोककलेविषयीची मानसिकता बदलण्याची गरज निर्माण झाली असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागतपर मनोगत शिबिराचे सह संचालक प्रा. विजयकुमार पाईकराव यांनी शिबिराची रूपरेषा आणि उद्देश विषद केला. शिबीर संचालक डॉ. गणेश चंदनशिवे यांनी तमाशातील द्विअर्थी कलेचा आणि बतावणीचा परिचय करून देताना तमाशा कलेचा इतिहास उलगडवून सांगितला. यावेळी व्यासपीठावर तमाशा परिषदेचे अध्यक्ष संभाजी जाधव, विद्यापीठाचे वित्त अधिकारी पंडित गवळी, प्रा. मोनिका ठक्कर, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक आशुतोष घोरपडे, प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे, प्रा. विजयकुमार पाईकराव हे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS