मुंबई : मुंबई पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थिनींना शैक्षणिक जीवनातच स्व-संरक्षणाचे धडे मिळणार आहेत. अंधेरी पूर्व, आर.के. मार्ग महापालिका शाळा आणि चकाला महापालिका शाळेतील विद्यार्थिनींना स्व-संरक्षणाचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंबंधी सामंजस्य करारावर मुंबई पालिका, अँमवे इंडिया एण्टरप्रायझेस आणि स्पोर्ट्स कराटे अँण्ड किक बॉक्सिंग असोसिएशनमध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे.
या कराराप्रसंगी महापालिकेचे उपायुक्त (शिक्षण) सुनील धामणे, अँमवे इंडियाचे प्रादेशिक मुख्य संदीप प्रकाश, मनपातील कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी विभागाचे प्रमुख आणि सहाय्यक आयुक्त (नियोजन) प्राची जांभेकर आणि इतर अधिकारी या वेळी उपस्थित होते. महिलांवरील अत्याचार आणि छळ या दोन समस्यांशी सामना करण्यासाठी अँमवे इंडियाने बालिका सक्षमीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. अशा प्रकारच्या पहिल्याच प्रकल्पाकरता मुंबई मनपाची निवड केली आहे. या प्रकल्प अंतर्गत महापालिका शाळांतील विद्यार्थिनींना स्व-संरक्षणाचे प्रशिक्षण देण्याच्या प्रायोगिक तत्त्वावरील उपक्रमाची घोषणा करण्यात आली.
प्रकल्पाचा पहिला टप्पा मुंबईतील दोन महापालिका शाळांमध्ये राबवला जाईल. अंधेरी (पूर्व) येथील आर.के. मार्ग महापालिका शाळा आणि चकाला महापालिका शाळेतील सातवी ते नववीच्या वर्गातील मिळून २५0 विद्यार्थिनींचा यामध्ये समावेश असेल. अलीकडच्या काळात स्त्रियांवरील अत्याचारांचे / हल्ल्यांचे प्रमाण वाढतेच आहे. अशा अनुचित घटनांवर तोडगा काढण्याकरता कायदा आणि सुव्यवस्था विभाग अथक परिश्रम करतो आहे; पण अशा प्रकारचा कोणताही हल्ला झालाच तर त्याला कसे तोंड देता येईल, या दृष्टीने तरुण मुलींना मानसिक आणि शारीरिक पातळीवर कणखर बनवणे आणि त्याकरता लागणारी कौशल्ये अंगी बनवण्याकरता प्रशिक्षण देणे, याकरता बृहन्मुंबई महापालिका शाळांतील पौगंडावस्थेतील मुलींकरता स्व-प्रशिक्षणाचे धडे देणारा हा विशेष प्रकल्प आहे. स्पोर्ट्स कराटे अँण्ड किक बॉक्सिंग असोसिएशन ही संस्था याबाबतचे प्रशिक्षण देणार आहे. यासाठी ३ महिन्यांच्या कालावधीमध्ये २५ सत्रांचे आयोजन करणार आहे. प्रशिक्षणावर मनपातील अधिकारी नियमित तत्त्वावर देखरेख ठेवणार आहे.


No comments:
Post a Comment