जीपीएसद्वारे पालिका १९ लाख झाडांची गणना करणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 February 2014

जीपीएसद्वारे पालिका १९ लाख झाडांची गणना करणार

मुंबई : कामाच्या कंत्राटाचे मूल्य, कंपनीची क्षमता आदी मुद्दय़ांवरून गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या मुंबईतील वृक्षगणनेला अखेर सोमवारी मुहूर्त मिळाला. 'ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम'(जीपीएस) या आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत महापालिकेने मुंबई विद्यापीठासमोरील ओव्हल मैदानातून या गणनेची सुरुवात केली. मुंबईतील तब्बल १९ लाख वृक्षांची आणि खाजगी इमारतींमधील झाडांची गणना करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी दिली. 

मुंबईत शेवटची वृक्षगणना २00७ मध्ये झाली होती. त्यानुसार १९ लाख झाडे आहेत. महाराष्ट्र वृक्ष संवर्धन आणि जतन कायद्यानुसार दर पाच वर्षांनी वृक्षगणना करणे आवश्यक आहे. यामुळे ही गणना करण्याचे काम नागपूरच्या 'सार आयटी' या कंपनीच्या १२ जणांच्या चमूला दिले आहे. येत्या वर्षभरात बीएआरसी, संरक्षण दल क्षेत्र, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, आरे वसाहत सोडून संपूर्ण मुंबईत वृक्षगणना होणार आहे. शिवाय संपूर्ण मुंबईतील खाजगी इमारतींमधील झाडांचीही गणना होणार असून गणना झाल्यानंतर संकलित केलेली माहिती (डाटा) महापालिकेच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात येईल, असे श्रीनिवास यांनी सांगितले. 

वृक्षगणक वृक्षांची नोंद घेताना त्याचे नाव काय, मालकी हक्क, वर्गवारी, झाडांचे आर्थिक महत्त्व, त्याचा वैद्यकीय उपयोग, त्यावर येणारी फुले आणि फळांचा रंग, झाडांची नेमकी संख्या किती, कोणत्या प्रकारची झाडे किती आहेत, सर्वाधिक झाडे कोणती आहेत, त्या झाडांची उंची, त्यांचे वय आणि शास्त्रीय नाव, त्यांचे कुटुंब व त्यांची जैवविविधता आदी २५ प्रकारांची नोंद करण्यात येणार आहे. मुंबईकरांनी खाजगी कर्मचार्‍यांचे ओळखपत्र पाहून त्यांना सहकार्य करावे, असे आवाहन श्रीनिवास यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS