ठाणे : आपल्या समाजात प्रचंड विषमता आहे, त्यामुळेच नक्षलवाद निर्माण झाला आहे. समाजातील विषमता दूर केल्यास ही समस्या आपोआप दूर होऊ शकते, असे प्रतिपादन डॉ. प्रकाश आमटे यांनी ठाण्यात बोलताना व्यक्त केले. लोकबिरादरी प्रकल्पाच्या रुग्णालयास आर्थिक निधी उपलब्ध करून देण्यासाठी होणार्या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. प्रकाश आमटे यांनी हे प्रतिपादन केले.
समाजातील संवेदना अद्याप जागृत असल्यामुळे आम्हाला मदत मिळते आणि आम्हाला मिळणारी मदत हीच आमची ऊर्जा असल्याचे प्रकाश आमटे यांनी सांगितले. शासनाच्या योजना या आदिवासींपर्यंत पोहचत नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचेही त्यांनी सांगितले. माणसाला रोजीरोटी मिळाली की कोणीही हिंसेवर उतरत नाही. आमचा कोणताही राजकीय हेतू नाही, आमचे काम गेली ४0 वर्षे ते पाहत आहेत, त्यामुळे आम्हाला नक्षलवादाची भीती नाही. नक्षलवादाची भीती ही काल्पनिक असल्याचे आमटे यांनी सांगितले. सरकारलाही अनेक वेळा सहकार्य करावेसे वाटते; पण आपली यंत्रणा सहज हलत नाही. मागे लागल्याशिवाय कामे होत नाहीत, असे सांगून आमचे काम हे सरकारच्या भरवशावर नसल्याने आम्हाला कशाचाच त्रास होत नाही, असेही डॉ. प्रकाश आमटे यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे आजच्या डॉक्टरांनी केवळ शहरात काम न करता चंद्रपूर, गडचिरोलीसारख्या ग्रामीण भागातही काम केले पाहिजे, असे आमटे पुढे म्हणाले.प्रेरणा कला संस्था, कोकण कला अकादमीतर्फे यापूर्वी सन्यस्त खडग, शिवबा ही नाटके सादर करण्यात आली होती. आता प्रदीप ढवळ लिखित द्वंद्व हे नाटक १६ आणि १७ फेब्रुवारीला काशिनाथ घाणेकर नाट्यगृहातील छोट्या सभागृहात सादर केले जाणार आहे. सन्यस्त खडग या नाटकाचे सलग १२ प्रयोग करण्यात आले होते, तर द्वंद्व या नाटकाचे सलग १२ प्रयोग केले जाणार असल्याचे संजय केळकर यांनी सांगितले. शनिवारी दुपारी १२ वाजल्यापासून रविवारी दुपारी १ वाजेपर्यंत प्रत्येक अडीच तासांनी एक प्रयोग केला जाणार असल्याचे केळकर यांनी सांगितले. या १२ नाट्य प्रयोगांपैकी ९ नाट्य प्रयोगांना ठाण्यातील शिक्षण आणि सामाजिक संस्थांनी यापूर्वीच आर्थिक पाठबळ दिले आहे. या नाट्य प्रयोगातून मिळणारे सर्व उत्पन्न हे डॉ. प्रकाश आमटे उभारत असलेल्या सुसज्ज रुग्णालयासाठी दिले जाणार आहे.


No comments:
Post a Comment