मुंबई- आर्थिक परिस्थिती आणि महागडे क्लास यामुळे यूपीएससीची परीक्षा देणारे अनेक विद्यार्थी गुणवत्ता असूनही अपेक्षित यश प्राप्त करू शकत नाहीत. याची दाखल घेत मुंबई विद्यापीठ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च ऍण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, पुणे (बारटी) यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या कालिना कॅम्पसमध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी एक वर्ष मुदतीचे प्रशिक्षण वर्ग सुरू केले.
प्रशिक्षण वर्गात सहभागी होण्यासाठी सीईटी परीक्षा घेण्यात आली होती. यातील १३०२ विद्यार्थ्यांपैकी २७७ विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठ केंद्राकरिता अर्ज केले होते. त्यापैकी ५० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. ‘यूपीएससी’चे प्रशिक्षण कोणत्याही विद्यापीठात मिळण्याची ही पहिलीच वेळ असून कुलगुरू डॉ. राजन वेळूकर, बीसीयूडी संचालक प्रा. राजपाल हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण सुरू करण्यात आले. या प्रशिक्षण वर्गाच्या दोन तुकड्या कालिना कॅम्पसमध्ये तर एक बॅच रत्नागिरी उपकेंद्रात सुरू राहणार आहे. वाणिज्य विभागाच्या प्रा. डॉ. संगीता पवार या प्रशिक्षण केंद्राच्या समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत.
यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन सनदी अधिकारी बनण्याची सुवर्णसंधी विद्यार्थ्यांना प्राप्त झाली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन समाजहित साधा. यातून समाजपरिवर्तन नक्कीच घडेल. परिणामी देशाच्या विकासाला हातभार लागेल. यासाठी ध्येय डोळ्यांसमोर ठेवून विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करण्याची गरज आहे.
- राजन वेळूकर, कुलगुरू मुंबई विद्यापीठ.


No comments:
Post a Comment