मुंबई : नवीन नळजोडणी देताना प्लंबरने महापालिकेकडे शिधापत्रिका (रेशनकार्ड) देताना त्याचा फक्त एकदाच वापर केला पाहिजे. शिधापत्रिकेचा वापर यापुढे अन्य जोडणी देताना करण्यात येणार नाही, असे प्रतिज्ञापत्र १00 रुपयांच्या स्टँप पेपरवर महानगर दंडाधिकारी किंवा नोटरीसमोर सादर करणे आवश्यक आहे. या सूचनेचे पालन न करणार्या प्लंबरविरोधात नियमानुसार कारवाई करण्याच्या परिपत्रकामुळे अनधिकृत जोडण्या देण्याचे पेव फुटले आहे, अशी चर्चा नगरसेवक दीपक भूतकर यांनी कलम ६६-ब अन्वये सोमवारी पालिका सभागृहात घडवून आणली. या वेळी पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांकडून उत्तर न मिळाल्यामुळे सभागृह झटपट तहकूब करण्यात आले.
या परिपत्रकामुळे बेकायदा जोडण्यांचे पेव फुटले आहे. सहा हजार रुपये याप्रमाणे एक जोडणी देण्यात येत आहे. परिणामी महापालिकेचा २0 प्रभागांमधील सुमारे १५ ते २0 कोटी रुपयांचा महसूल बुडत आहे, असे भूतकर यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणले. यावर उत्तर देताना आतापर्यंत चार हजार ५0१ अनधिकृत जोडण्या तोडल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी दिली.
जानेवारी ते नोव्हेंबर २0१३ पर्यंत गलिच्छ वसाहतींमध्ये नवीन नळजोडण्या देण्यात आल्या. त्यापैकी शहरात ३२६, पश्चिम उपनगरात ६९३ आणि पूर्व उपनगरात दोन हजार २७४ जोडण्या दिल्या आहेत, अशी माहिती देशमुख यांनी दिली. पण त्यांच्या उत्तराने समाधान न झालेल्या नगरसेवकांनी संबंधित विभागाचे अतिरिक्त आयुक्त राजीव जलोटा यांनी उत्तर द्यावे, असा आग्रह धरला पण त्यांना सभागृहात येण्यासाठी विलंब झाल्यामुळे सभागृहात झटपट तहकुबी मांडली असता उपमहापौर मोहन मिठबावकर यांच्या उपस्थितीत एकमताने संमत झाली.


No comments:
Post a Comment