मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रास्ता रोको आंदोलन आज महाराष्ट्रभर सुरु झाले आहे. राज ठाकरेंना चेंबूरच्या आरसीएफ पोलिस स्टेशनमधील पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. तेथे राज ठाकरेंसह शर्मिला ठाकरे, पुत्र अमित, आमदार बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांना नेण्यात आले आहे. राज ठाकरेंना पोलिसांनी अटक केल्यानंतर शर्मिला ठाकरेंनी आरसीएफ पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. राज यांना अटक झाल्याचे कळताच मनसेचे वाशी टोलनाक्यावर थांबलेले हजारो कार्यकर्ते आरसीएफ पोलिस ठाण्याबाहेर जमा झाले आहेत. दरम्यान, राज ठाकरेंना अटक केली नसल्याचे सांगत प्रतिबंधक कारवाईचा भाग म्हणून ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी स्पष्टीकरण दिले आहे.
राज्यातील प्रमुख शहरात आंदोलनाने पेट घेतला असून, मुंबई-पुणे-नाशिक या बेलमध्ये आंदोलनाची तीव्रता जास्त आहे. या शहरात वाहनांच्या लांबच लांब रांग लागल्या आहेत त्याचा वाहतुकीवर मोठा परिणाम झालेला दिसत आहे. आंदोलनात मनसेच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या आहेत. सरकारनेही कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मोठी तयारी केली आहे. सध्या तरी मनसेचे आंदोसन शांततेत पण मोठ्या तीव्रतेने सुरु आहे.
पुणे, नाशिक, मुंबई, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर शहरातील मनसेचे अनेक नेत्यांना कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सकाळी दहाच्या सुमारास राज ठाकरे पत्नी शर्मिला ठाकरे व पुत्र अमित ठाकरेसह वाशी टोलनाक्यावर आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघाले. मात्र त्याआधीच राज ठाकरेंना सायन-चेंबूर परिसरातील चुनाभट्टी येथे मुंबई पोलिसांनी रोखले व ताब्यात घेतले. राज ठाकरे आता पोलिसांच्या गाडीत बसले असून, पोलिस त्यांना कोठे घेऊन जाणार हे स्पष्ट झाले नाही. मात्र राज हे वाशी टोलनाक्यावर जाणार होते.
मनसेचे आमदार बाळा नांदगावकर व नितीन सरदेसाई यांची पोलिसांची बाचाबाची झाली. त्यानंतर आम्ही शांततेत आंदोलन करीत असून, तुम्हाला आमचे आंदोलन चिरडून काढायचे आहे का असे सवाल नांदगावकर यांनी पोलिसांना केला. त्यावर कायदा व सुव्यवस्थेची स्थिती बिघडू शकते त्यामुळे आम्ही तुम्हाला मोकळे सोडू शकत नाही. बळाचा वापर करण्याची वेळ आणू देऊ नका, असे आवाहन पोलिसांनी मनसेच्या नेत्यांना केले. त्यानंतर नांदगावकर, सरदेसाई यांच्यासह राज, पत्नी शर्मिला व पुत्र अमित यांना पोलिसांच्या गाडीत बसवून वाशीला घेऊन जाऊ असे सांगत गाडीत बसवले व थेट त्यांनी चेंबूरमधील आरसीएफ पोलिस ठाण्यात नेण्यात आले.
मुंबईतील आमदार प्रविण दरेकर, शिशिर शिंदे, नाशिकचे आमदार नितीन भोसले, सांगळे यांना पोलिसांनी अटक केली आहे. राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन करताना म्हटले आहे की, बारावीच्या परीक्षा असल्याने विद्यार्थी व पालकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. तसेच सामान्य जनतेला वेठीस धरू नका. तसेच रास्ता रोको आंदोलनामुळे ज्यांना त्रास होणार त्यांची माफी मागतो. मात्र आम्हाला अशा प्रकारचे आंदोलन करण्यावाचून पर्याय राहिला नसल्याने हे पाऊल उचलावे लागल्याचे त्यांनी सांगितले. राज ठाकरेंसह आपण व आमचा मुलगा अमित वाशी टोलनाक्यावर आंदोलन करणार आहोत. यात आम्हाला अटक झाली तरी बेहत्तर असे शर्मिला ठाकरेंनी म्हटले आहे.


No comments:
Post a Comment