मुंबई : आदर्श गृहनिर्माण घोटाळ्यात राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याविरोधात खटला चालवण्यास नकार देणारे राज्यपाल के. शंकरनारायणन यांना माघारी बोलवावे, या मागणीसाठी महायुतीचे शिष्टमंडळ राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची येत्या मंगळवारी राजधानी दिल्लीत भेट घेणार आहे.
अशोक चव्हाण यांच्याविरुद्ध खटला भरण्यासाठी या प्रकरणाचा तपास करणार्या सीबीआयने राज्यपालांकडे परवानगी मागितली होती. राज्य सरकारच्या शिफारशींची अंमलबजावणी करताना राज्यपालांनी सीबीआयला परवानगी नाकारली होती. त्यानंतर भारतीय जनता पार्टीने हा विषय उच्च न्यायालयात नेला. दरम्यान, न्यायालयात सीबीआयने या खटल्यातून अशोक चव्हाण यांचे नाव वगळण्याची विनंती केली आणि न्यायालयाने ती फेटाळून लावली. त्यानंतर राज्यपालांना माघारी बोलवा, या विरोधकांच्या मागणीला वेग आला आहे. राज्यसभेचे विरोधी पक्षनेते अरुण जेटली आणि लोकसभेतील भाजपाचे उपनेते गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे शिष्टमंडळ येत्या ११ फेब्रुवारीला संध्याकाळी सात वाजता राष्ट्रपती मुखर्जी यांना दिल्लीत भेटणार आहेत. शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते अनंत गीते, प्रवक्ते खासदार संजय राऊत, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे, रिपब्लिकन पार्टीचे नेते खासदार रामदास आठवले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, राष्ट्रीय समाज पार्टीचे नेते महादेव जानकर आदींचा या शिष्टमंडळात समावेश आहे.


No comments:
Post a Comment