मुंबई : चेंबूर अणुशक्तीनगर येथे कबरस्तानासाठी जागा उपलब्ध करून त्याची निर्मिती करण्यासाठी निधी मिळवून देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. शिक्षण आणि समाजकल्याण मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई उपनगर नियोजन समितीची बैठक म्हाडा कार्यालयात घेण्यात आली होती. या वेळी शासकीय अधिकारी, स्थानिक खासदार, आमदार, नगरसेवक तसेच सामाजिक संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसेनेचे स्थानिक आमदार प्रकाश फातर्फेकर यांनी चेंबूर अणुशक्तीनगर येथे नव्याने कबरस्तानाची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी करत त्यासाठी नियोजन समितीकडे जागेबरोबरच निधीची मागणी केली. या परिसरात मुस्लिम बांधवांची संख्या वाढल्याने कबरस्तानाची आवश्यकता भासत असल्याचे फातर्फेकर यांनी निदर्शनास आणून दिले. कबरस्तानासाठी भूखंड आरक्षित केला असतानादेखील मुस्लिम बांधवांना तो सोपवला जात नसल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. कबरस्तानाबरोबरच वाढत्या गर्दीचा विचार केला तर चेंबूर परिसरातील रस्त्यांची दुरवस्था असून, पोलीस बळदेखील कमी पडत असल्याची तक्रार करण्यात आली.
