मुंबई : अभिनेता शाहरूख खानने वांद्रे येथील आपल्या 'मन्नत' बंगल्या शेजारी बांधलेला अनधिकृत 'रँप' सात दिवसांत तोडण्याची नोटीस पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी बजावली आहे. भाजपा खा. पूनम महाजन यांनी याबाबत कुंटे यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. शाहरूखने बांधलेल्या 'रँप' बाबत स्थानिक रहिवासी आणि प्रसारमाध्यमांनी महाजन यांच्या आधीच वारंवार आयुक्तांचे लक्ष वेधले होते, पण त्याची लगेच दखल न घेणार्या आयुक्तांनी खासदारांच्या तक्रारीनंतर ही नोटीस जारी केली आहे.
'मन्नत' शेजारील जागेवर शाहरूखने आपली अलिशान व्हॅनिटी व्हॅन उभी करण्यासाठी बेकायदेशीर 'रँप' उभारला होता. त्याला स्थानिक रहिवाशांकडून कडाडून विरोध करण्यात आला. येथील माऊंट मेरी चर्चमध्ये जाणार्या भाविकांनाही या 'रँप'मुळे बराच त्रास होत असल्याने त्यांनीही पालिकेच्या स्थानिक कार्यालयात आणि आयुक्तांकडे गेल्या वर्षीच तक्रारी केल्या होत्या. पण त्यांच्या तक्रारीला 'टोपली' दाखवण्यात आली होती. गेल्या आठवड्यात खासदार पूनम महाजन यांनी या अनधिकृत 'रँप'विषयी आयुक्तांना पत्र लिहून त्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. आयुक्तांनी त्याची तत्काळ दखल घेऊन यासंदर्भात चौकशी केली आणि हा 'रँप' येत्या सात दिवसांत हटवण्याची नोटीस शाहरूखला बजावली आहे.
